सचिन विरूध्दची तक्रार निकाली

File photo

लोकपाल डी.के.जैन : सचिनविरोधातील तक्रारीमध्ये तथ्य नाही 

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयवर नियुक्त करण्यात आलेले लोकपाल डी.के.जैन यांनी सचिन तेंडुलकरवर ठेवण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा निर्वाळा देत त्याच्यावरील तक्रार निकाली काढली आहे.

सचिन तेंडुलकर बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. या समितीकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. आयपीएलमध्येही सचिन मुंबई इंडियन्स संघाचा आयकॉन म्हणून काम करतो. मात्र बीसीसीआयच्या नियमानुसार, संघटनेमध्ये पद भूषवत असलेला कोणताही अधिकारी आयपीएलमध्ये काम करु शकत नाही. याच मुद्‌द्‌यावरुन सचिनविरोधात बीसीसीआयच्या लोकपालांकडे तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीवरुन सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना जस्टीस जैन यांच्यासमोर हजर राहुन आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी सचिनने आपल्याला मुंबई इंडियन्सकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ होत नसल्याचे सांगितले होते. याचसोबत आपले काम हे फक्त सल्ला देण्याचे असून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग नसल्याचेही सचिनने स्पष्ट केले होते. या प्रकरणानंतर जोपर्यंत नियमांमध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत क्रिकेट सल्लागार समितीचे काम पाहणार नाही अशी भूमिका सचिनकडून घेण्यात आली.

यानंतर जैन यांनी तात्काळ पावल उचलत सचिनविरोधातल्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचा अर्थ नसल्याचे सांगत त्याची सर्व आरोपांमधून मुक्तता केली आहे. जैन यांनी आपल्या दोन पानांच्या निर्णयामध्ये स्पष्ट केले की, सचिन तेंडुलकराने आपली बाजू स्पष्ट केली असून तो आता सीएसीचा सदस्य म्हणून कार्यरत राहणार नाही. त्यामुळे या प्रकरणाला आता काहीच अर्थ नसून हा विषय येथेच समाप्त होत आहे. त्याचप्रमाणे, बीसीसीआयने सीएसी सदस्यांचे कार्यक्षेत्र निर्धारीत केले, तर मात्र सचिन पुन्हा एकदा सीएसीचा सदस्य होण्याचा विचार करु शकतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)