किव्ह – युक्रेनमधील अनेक महत्वाच्या इमारतींवर रशियाच्या सैन्याने आज तोफांचा जोरदार मारा केला. यामध्ये राजधानी किव्ह, खारकिव्ह आणि अन्य शहरांमधील महत्वाच्या पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. युक्रेनने काळ्या समुद्रातील रशियाच्या जहाजांवर हल्ले केल्याचा आरोप रशियाने केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणूनच हा तोफांचा मारा केला गेल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनने मात्र रशियाचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
आज सकाळपासूनच राजधानी किव्हमध्ये संभाव्य हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजू लागले होते. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे संदेश प्रशासनाच्यावतीने नागरिकांना मोबाईलवर पाठवण्यात आले होते. या तोफांच्या माऱ्यामुळे किव्ह शहरातील पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
खारकिव्ह शहरातही दोन मोठ्या इमारतींवर तोफांचा मारा झाला होता. यामुळे शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता. वीज वितरण यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे झापुरझ्झिया शहरातही वीज खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. युक्रेनमधील अन्य काही शहरांमध्येही तोफांचा मारा झाल्याचे वृत्त आहे.
किरोवोरहॅड भागात वीज केंद्रावर रॉकेटचा मारा झाला. विनिस्टिया भागात एक क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पण हे पाडलेले क्षेपणास्त्र रहिवासी भागात पडले. मात्र त्यामुले कोणतीही जीवितहानी झाली नाही. तोफांच्या मारयामुळे युक्रेनच्या काही भागांमध्ये रेल्वेचा वीजपुरवठाही खंडीत झाला होता.