आरटीई प्रवेश प्रकिया : समितीच करणार कागदपत्रांची छाननी

दोन उन्नत केंद्रांमध्ये असणार 24 सदस्य

पिंपरी – आरटीई प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रातील त्रुटी काढून वेळोवेळी प्रवेशास नकार देणाऱ्या शाळांना चाप बसावा, यासाठी यंदा शिक्षण विभागाने कागदपत्रांची छाननी करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग आकुर्डी व पिंपरी येथील उन्नत केंद्रामध्ये आरटीईतील विद्यार्थ्यांची कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. तसेच, यंदा प्रथमच कागदपत्रांची छाननी शाळा स्तरावर न होता समितीतर्फे केली जाणार आहे. पालकांनी मोबाईलवर शालेय प्रवेशाचा संदेश आल्यानंतर शाळांशी संपर्क न करता प्रथम या केंद्रामध्ये येऊन कागदपत्रांची छाननी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के प्रवेश दिले जातात. परंतु, काही शाळा कागदपत्रांमध्ये चुका काढून विद्यार्थ्यांच्या प्रवेशास नकार देतात. यामुळे, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे प्रवेश मिळण्यासाठी व प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना चाप बसण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये कागदपत्राची छाननी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये 24 सदस्य असणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शिक्षण विभागाने दोन उन्नत केंद्रामध्ये 12 सदस्यांचा एक गट तयार केला आहे. यामध्ये, शिक्षण अधिकाऱ्यांऐवजी सहाय्यक शिक्षण अधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

…तर शाळांना प्रवेश द्यावाच लागणार

प्रवेश प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांची नावे आली आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी समितीचे सदस्य करणार आहेत. अर्जावर अध्यक्षांनी स्वाक्षरी केल्यानंतर अर्ज ऑनलाईन ऍलॉट केला जाणार आहे. यानंतर, अध्यक्षांच्या स्वाक्षरीचा अर्ज पालकांना दिल्यानंतर तो शाळेत दाखवयाचा आहे. यामुळे, समितीने कागदपत्रांची छाननी केल्यानंतर शाळांनी पुन्हा कागदपत्रे बघण्याची आवश्‍यकता राहणार नाही. या समितीत दोन सचिव, सदस्य म्हणून विषयतज्ञांची नेमणूक केली आहे. तसेच, अनुदानित व विना अनुदानित खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शाळांचे पालक, शिक्षक प्रतिनिधी, संस्थाचालक प्रतिनिधी यांचा समावेश आहे. याचबरोबर, पालकांनी शाळा कोणत्या उन्नत केंद्राच्या अंतर्गत येतात, याची माहिती घेण्याची गरज आहे. शहरातील पिंपरी व आकुर्डी या उन्नत केंद्रात गुरुवार (दि.11) पासून सकाळी दहा वाजल्यापासून कागदपत्रांची छाननी सुरु होणार आहेत.

“विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपसणी समितीचे सदस्य करणार आहेत. तसेच, केंद्रांमध्ये कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थित होण्यासाठी पालकांना टोकन सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या अर्जावर समितीच्या अध्यक्षांची सही झाल्यानंतर प्रवेश मिळणार आहे.
-पराग मुंढे, माध्यमिक विभाग-शिक्षणाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.