आबूधाबी – कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सची वाताहत केली. महंमद सिराज, नवदीप सैनी व यजुवेंद्र चहल यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूने कोलकाताचा 20 षटकांत 8 बाद 84 असा खुर्दा उडवला.
कोलकाताचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय साफ फसला. संघाच्या धावसंख्येची चाळीशी पार होण्यापूर्वीच त्यांचे सहा फलंदाज तंबूत परतले होते. त्यांच्या डावाची सुरुवातच निराशाजनक झाली. संघाच्या 3 धावा असतानाच सलामीवीर राहुल त्रिपाठी, नितीश राणा व शुभमन गिल तंबूत परतले होते.
सिराजने या दोघांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. त्याची हॅट्ट्रिक मात्र पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर डावातील तिसऱ्या षटकात सैनीने गिलला बाद केले व संघाची अवस्था 3 बाद 3 अशी दयनीय केली. टॉम बॅन्टन व दीनेश कार्तिक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण बॅटनलाही सिराजनेच बाद केले व कोलकाताची स्थिती 4 बाद 14 अशी आणखी बिकट बनली.
सिराज व सैनी यांचे पहिले स्पेल संपल्यावर कर्णधार कोहलीने अनुभवी लेगस्पीन गोलंदाज चहलकडे चेंडू सोपवला. त्यानेही कोहलीचा विश्वास सार्थ ठरवताना कार्तिकला बाद केले व कोलकाताच्या फलंदाजीची वाताहत केली. यावेळी त्यांची गत 5 बाद 32 अशी बनली होती. त्यावेळी कर्णधार मॉर्गन व पॅट कमिन्स ही जोडी एकत्र आली. त्यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कोलकाताला बेंगळुरूच्या गोलंदाजीवर धावा करणेही मुश्कील झाले होते.
चहलच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात कमिन्सही बाद झाला. या सामन्यात कोहलीने गोलंदाजीत केलेले बदल कोलकातासाठी नुकसानकारकच ठरले. त्याने प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देत वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी दिली. त्यानेही कोहलीचा विश्वास सार्थ ठरवताना खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मॉर्गनला बाद केले. त्यावेळी कोलकाता संघ
7 बाद 57 असा अडचणीत आला. मॉर्गनने 34 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 31 धावांची खेळी केली.
मॉर्गन बाद झाल्यावर कुलदीप यादव व लॉकी फर्ग्युसन यांनी चांगला प्रतिकार केला. या जोडीने 8 व्या गड्यासाठी 27 धावांची भागीदारी केली. कोलकाताला धावांची शंभरीदेखील गाठता आली नाही. बेंगळुरूकडून महंमद सिराजने 3 गडी बाद केले. त्याला साथ देताना यजुवेंद्र चहलने 2 बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर व नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
- स्पर्धेतील ठळक घडामोडी
-पंजाबच्या विजयाने प्ले-ऑफची संधी
-गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप
-पंजाबच्या विजयाने बेंगळुरू, कोलकाताला धक्का
-समालोचन मराठीतही करण्याचा राज ठाकरे यांचा इशारा
-रहाणेच्या अपयशाने दिल्ली संकटात
-मधल्या फळीतील फलंदाजीचा प्रश्न ऐरणीवर
-पुढील सर्व सामने सर्व संघांसाठी महत्त्वाचे
-एका पराभवानेही प्ले-ऑफची संधी हुकणार
चहलचा गलिच्छपणा –
या सामन्यात बेंगळुरूचा लेगस्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या गलिच्छपणावर सोशल मीडियावर चांगलीच शेरेबाजी झाली. कोलकाताच्या 6 बाद 46 धावा झालेल्या असताना सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला चहल चक्क वारंवार थुंकताना दिसला. हे दृष्य इतके गलिच्छ होते त्यामुळे आता त्याच्यावर आयपीएल समिती कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असताना चहलने केलेले हे कृत्य आयपीएल समिती खपवून घेणार का, हादेखील मुद्दा चर्चिला जात आहे.
संक्षिप्त धावफलक –
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 8 बाद 84 धावा. (इयान मॉर्गन 31, टॉम बॅन्टन 10, कुलदीप यादव 12, लॉकी फर्ग्युसन नाबाद 19, महंमद सिराज 3-8, यजुवेंद्र चहल 2-15, वॉशिंग्टन सुंदर 1-14, नवदीप सैनी 1-23)