देवीच्या यात्रेवरून परतताना भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन मुलांचाही समावेश

सोलापूर – कर्नाटकात झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. होस्पेटजवळ दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
राघवेंद्र कांबळे, जानू कांबळे, राकेश कांबळे, रश्मिका कांबळे, (सर्वजण राहणार लवंगी, ता. दक्षिण सोलापूर) अशी चौघा मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बंगळुरूकडे पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले कारने निघाले होते. त्यांच्यासोबत इंडी तालुक्यातील नंद्राळ गावचे दोन नातेवाईकही होते. या सहाही जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
हा अपघात रविवारी सायंकाळी झाला. राघवेंद्र हे सोलापूरच्या दक्षिण सोलापूरमधल्या लवंगी गावचे रहिवासी होते. बंगळुरूत ते खासगी कंपनीत नोकरी करत होते. पत्नी आणि दोन चिमुकल्यांसह ते बंगळुरूत राहत होते. लवंगी येथे यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त ते गावी आले होते. यात्रा करून परत जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील सर्वजण जागीच ठार झाले.
दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांचा आणि इतर दोन नातेवाईकांच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. राघवेंद्र हे एकुलते एक होते. त्यांच्या अपघाती निधनाने वडील सुभाष आणि आई इंदुमती यांना घटनेने धक्का बसला आहे.





