मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू ऍडम गिलख्रिस्ट याने भारताचा नवोदित यष्टिरक्षक ऋषभ पंत याला मोलाचा सल्ला दिला आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर, असे गिलख्रिस्ट याने सांगितले आहे.
गेल्या वर्षापासून पंत याला भारतीय संघात अनेकदा संधी दिली गेली. मात्र त्याला थोडीफार देखील चमक दाखविता आली नाही. त्यालाच सातत्याने खेळविले जाण्यावर संघ व्यवस्थापन, निवडसमिती, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर सातत्याने टीका झालेली आहे. मात्र, तरीदेखील त्यालाच कायम ठेवण्यात येते व तो प्रत्यक्ष सामन्यात कधीच संघाला फायदेशीर ठरेल अशी कामगिरी करू शकलेला नाही. भारतीय संघात स्थान मिळविणे किती कठीण आहे आणि तू मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी जीवतोड मेहनत घेण्याबरोबरच स्वतःवरची जबाबदारी ओळखायला शिक. धोनीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नकोस त्याऐवजी स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर, असा सल्ला गिलख्रिस्टने दिला आहे.
पंतकडे गुणवत्ता आहे. त्याचे फलंदाजीतील अपयशच त्याला भोवत आहे. यष्टीमागेही तो अनाकलनीय चुका करताना दिसला आहे. त्याने पुन्हा एकदा नेटमध्ये सराव करताना आपल्याच खेळाचे रेकॉर्डिंग पाहिले पाहिजे, त्यालाच कुठे कमी पडत आहोत हे लक्षात येईल. केवळ आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात तो सातत्याने बाद होत आहे, याचाही विचार त्याने केला पाहिजे. धोनीची नक्कल करण्यापेक्षा स्वतःचे स्थान निर्माण केले पाहिजे, असेही गिलख्रिस्टने सांगितले.
पंतने आपल्या खेळातील त्रुटी दूर करण्यासाठी नेटमध्ये सराव करण्याबरोबरच आपल्या प्रशिक्षक तसेच कर्णधाराशी सातत्याने चर्चा केली पाहिजे. त्याच्याकडे नैसर्गिक आक्रमकता आहे, पण ती प्रत्यक्ष मैदानात त्याच्या कामगिरीतूनही सिद्ध झाली पाहिजे, असेही गिलख्रिस्ट म्हणाला.