मेलबर्न – रिकी पॉण्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग बसवली आहे, त्यामुळेच असे फटके तो मारतो, अशी अफवा त्यावेळी पसरली होती व तेव्हा खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉण्टिंगदेखील चक्रावला होता. या आठवणींना खुद्द पॉण्टिंगनेच उजाळा दिला. ही घटना घडली होती, दक्षिण आफ्रिकेत 2003 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या अंतिम लढतीत.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतात अनेक ठिकाणी भारतीय क्रिकेटपटूंच्या सुमार कामगिरीवर चाहत्यांनी रोष दाखवला होता. आपल्या खेळाडूंची पोस्टर्सची होळी केली गेली होती. तसेच खेळाडूंच्या घरावर दगडफेकीच्याही घटना घडल्या होत्या. त्यानंतर मात्र सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कात टाकली व स्वप्नवत कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. याही फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशीच झाला होता. यावेळी मात्र ऑस्ट्रेलियाने पहिल्या षटकापासून भारतीय गोलंदाजीचा पालापाचोळा करत ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या गाठली.
यात कर्णधार रिकी पॉण्टिंगने 140 धावांची अफलातून खेळी केली होती. पॉण्टिंगने जी चौफेर फटकेबाजी केली तो प्रत्येक फटका अविश्वसनीय होता, त्यामुळे सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्याला सांगितले होते की तुझ्या बॅटमध्ये सिंप्रग बसविल्याची चर्चा आहे, त्यावर खुद्द पॉण्टिंगदेखील चक्रावून गेला होता. पॉण्टिंगनेच या आठवणींना उजाळा दिला व सोशल मीडियावर त्यावेळी वापरलेल्या बॅटचा फोटोही पोस्ट केला आहे. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 बाद 359 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरादाखल भारताला पावसाने व्यत्यय आल्यानंतर खेळ सुरू झाला त्यानंतर 40 षटकांत 234 धावांपर्यंतच मजल मारता आली व विजेतेपद गमवावे लागले होते.