Renault Duster Bharat NCAP Rating: भारतीय वाहन बाजारात आपल्या भक्कम बांधणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेनो डस्टरने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रेनो इंडियाच्या नवीन डस्टरने ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम’ (Bharat NCAP) अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रैश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग पटकावले असून, सुरक्षिततेच्या बाबतीत ही एसयूवी सर्वोत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यम आकाराच्या एसयूवी श्रेणीतील ही कार आता ग्राहकांसाठी सुरक्षिततेचा एक खात्रीशीर पर्याय म्हणून समोर आली आहे. भारत NCAP ने डस्टरच्या इव्होल्यूशन (टर्बो १६० मॅन्युअल), टेक्नो (टर्बो १६० डीसीटी) आणि आयकॉनिक (टर्बो १६० मॅन्युअल) यांसारख्या विविध व्हेरिएंट्सची चाचणी केली. या क्रॅश टेस्ट दरम्यान विविध कोनातून झालेल्या धडकेनंतर डस्टरने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. गुणांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, प्रौढ प्रवासी सुरक्षितता (Adult Occupant Protection) श्रेणीत ३२ पैकी ३०.४९ गुण आणि बाल प्रवासी सुरक्षितता (Child Occupant Protection) श्रेणीत ४९ पैकी ४५ गुण मिळवून या कारने आपली मजबुती दाखवून दिली आहे. रेनोच्या ‘ग्लोबल ह्युमन फर्स्ट’ प्रोग्राम अंतर्गत सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य या निकालातून अधोरेखित झाले आहे. ३५ हून अधिक स्टँडर्ड फीचर्स – या नवीन डस्टरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ३५ हून अधिक स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये सर्व व्हेरिएंट्समध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि ३-पॉईंट सीट बेल्ट यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. हेही वाचा – ‘या’ तारखेपासून इंधन दरात प्रतिलिटर 8 ते 15 रुपयांपर्यंत वाढ होणार? विशेष म्हणजे, या एसयूवीच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ‘लेव्हल २’ प्रगत चालक सहाय्यता प्रणाली (ADAS) देण्यात आली असून, त्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि ऑटोनोमस इमर्जन्सी ब्रेकिंगसह एकूण १७ प्रगत फीचर्स मिळतात. सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १०.४९ लाख रुपये किंमत आणि इंजिन क्षमतेचा विचार करता, नवीन रेनो डस्टरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १०.४९ लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत १८.६९ लाख रुपयांपर्यंत जाते. यात ९९९ सीसी ते १३३३ सीसी पर्यंतचे शक्तिशाली पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ते आपल्या सेगमेंटमधील सर्वात दमदार इंजिन मानले जात आहे. आकर्षक एलईडी लाइट्स, १८-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, पॅनोरामिक सनरूफ आणि प्रीमियम इंटीरियरसह ही कार रस्ते धावण्यास सज्ज आहे. तसेच, यात १०.१ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारख्या आधुनिक सोयीसुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन डस्टरची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली असून, ५ स्टार रेटिंगमुळे या कारच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.