…अन्‌ रेमडेसिविरचा गोंधळ सुरूच होता! इंजेक्‍शन मिळवण्यासाठी रुग्णालयांनी नातेवाईकांना पुन्हा पिटाळले

पुणे – रेमडेसिविरचा गोंधळ सोमवारीही सुरू होता. खासगी रुग्णालयांनी नातेवाईकांना इंजेक्‍शन मिळवण्यासाठी पिटाळले. मागणी जास्त आणि पुरवठा कमी हा प्रकार असल्यानेच हा गोंधळ अद्यापही सुरू आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाने सोमवारी 6 हजार रेमडेसिविर इंजेक्‍शनचे वाटप केले आहे. सध्या 15 हजार रेमडेसिविरची मागणी आहे.

सरकारी रुग्णालये, महापालिका, पुणे जिल्हा ग्रामीण, छोट्या रुग्णालयांसाठी मान्यताप्राप्त स्टॉकिस्टकडे या इंजेक्‍शनचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तरीही अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळवण्यासाठी बाजारात फिरत होते. हे इंजेक्‍शन मिळवण्यासाठी हरतऱ्हेने अनेकजण प्रयत्न करत होते.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जर इंजेक्‍शन सरकारी रुग्णालय आणि अन्य नोंदणीकृत खासगी रुग्णालयांना मिळणार आहेत किंवा दिले गेले आहेत, तर या खासगी रुग्णालयाकडून नातेवाईकांना हे इंजेक्‍शन शोधण्यासाठी बाहेर का पाठवले जात आहे, हा महत्त्वाचा प्रश्‍न यातून निर्माण झाला आहे.

सहा हजार इंजेक्‍शनचे वाटप सोमवारी केले गेले. काही रुग्णालयात त्याचा गैरवापर होत असेल, म्हणजे गरज नसताना दिले जात असेल किंवा साठा केला जात असेल. चुकीच्या पद्धतीने विक्री होत असेल तर भरारी पथकाद्वारे कारवाई केली जात आहे. आठवडाभरात दोघांवर कारवाई केली आहे. हे इंजेक्‍शन सरसकट सर्वच रुग्णांना देण्यापेक्षा, रुग्णाची स्थिती पाहूनच दिले जात आहे का, हे या पथकामार्फत पाहिले जाईल.
– एस. व्ही. प्रतापवर, सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.