नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 14 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या जामीन अर्जासंदर्भात न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. वेळेत म्हणणे सादर न झाल्याने सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. रेखा जरे यांच्या हत्येतील फरार असलेला संशयित मुख्य आरोपी बाळ बोठे याने ऍड. महेश तवले यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. 30 डिसेंबर रोजी रेखा जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बोठे हा फरार असून, तो अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. त्याच्या शोधासाठी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आलेली आहेत.
बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांचे म्हणणे दुपारपर्यंत सादर झाले नाही. त्यामुळे आज बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी सुनावणी सोमवारी ठेवण्याची विनंती केली होती.
दरम्यान, मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचे वकील महेश तवले यांनी समाजमाध्यमांवर काही समाजसेवक या प्रकरणाविषयी चुकीच्या पोस्ट शेअर करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अशा पोस्टची प्रिंट तत्काळ जमा करा, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मीडिया ट्रायल नको : नातू
रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाची कोणतीही “मीडिया ट्रायल’ करू नये. या घटनेमध्ये आपण थिल्लरपणा सहन करणार नाही. प्रसारमाध्यमांनी संयमाने वागावे. तसेच, सुनावणीदरम्यान किंवा पोलीस तपासात माध्यमांकडून वार्तांकन करताना संयम सुटल्याचे निदर्शनास आल्यास थेट कारवाई करू, असा इशारा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिला आहे.