रेखा जरे खून प्रकरण : 5 आरोपींच्या विरोधात 730 पानांचे दोषारोपपत्र दाखल

नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणाला येत्या 2 मार्चला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यातील मुख्य संशयित सूत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्याप पसार आहे. त्यामुळे उर्वरित पाच आरोपीविरोधात तब्बल 730 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी आज पारनेर न्यायालयात दाखल केले.

सागर उत्तम भिंगारदिवे (रा. शास्त्रीनगर केडगाव), ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (रा. प्रवरानगर ता. राहाता), फिरोज राजू शेख (रा. संक्रापूर आंबी ता, राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (रा, कडीत फत्याबाद, ता. श्रीरामपूर, आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगाव फाटा कोल्हार, ता. राहाता) या पाच संशयित आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जरे यांच्या खून प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे सापडल्यानंतर त्यांच्या विरोधात स्वतंत्रपणे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती तपासी अधिकार्‍यांनी दिली.
30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रात्री पावणे आठच्या सुमारास गळा चिरून हत्या झालेली आहे.

त्यात बाळ बोठे मुख्य संशयित आरोपी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर मोबाइल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच संशयित मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घोषित केले. तेव्हापासून बोठे हा पसार आहे.

बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालय व त्यानंतर औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळून लावला आहे. तथापि, तो अजुनही पोलिसांना सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतलेले आहे. त्या वॉरंटला बोठे याच्याकडून वकीलामार्फत जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी नंतर न्यायालयाने बोठे याचा तो अर्जही फेटाळलेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.