नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मंगळवारी (दि.15) दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र, त्यावरील निकाल न्यायालयाने आज राखून ठेवला आहे. उद्या (दि.16) या युक्तीवादावर निकाल होण्याची शक्यता आहे.
बोठे याच्यावतीने ऍड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला. बोठे हे पत्रकार म्हणून काम करीत आहेत. त्यांनी हनी ट्रॅप नावाने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या वृत्तमालिकेत सागर भिंगारदिवे याचा नामोल्लेख होता. भिंगारदिवे हाच हनी ट्रॅप चालवत असल्याचे बोठे यांनी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे त्या रागातून सागर भिंगारदिवे याने बोठे यांचे नाव घेतले असल्याचा युक्तीवाद ऍड. महेश तवले यांनी केला.
जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील सरकारची बाजू मांडताना म्हणाले, हनी ट्रॅपच्या बाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. हनी ट्रॅपबाबत पोलिसांनीही कोणतीही चौकशी केलेली नाही. त्यामुळे या हत्याकांडाचा आणि हनी ट्रॅपचा कोणताही संबंध नाही. सागर भिंगारदिवे याने त्या रागातून जर बोठे याचे नाव घेतले असेल, तर मग त्या दोघांमध्ये अनेकदा फोन कॉल कसे झाले? त्या दोघांमध्ये बैठका कशा झाल्या? दोघांचे कॉल डिटेल्स आणि हत्याकांडाचा घटनाक्रम जुळतो कसा?, असे प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित केले.
याशिवाय रेखा जरे यांच्या घरातून पोलिसांना चार पानी पत्र मिळाले आहे. त्यात त्यांनी बोठे याचा नामोल्लेख केलेला आहे. तसेच त्याच्यापासून जीविताला धोका असल्याचेही नमूद केले असल्याचा युक्तीवाद ऍड. पाटील यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. मात्र, अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. उद्या (दि.16) त्यावर निकाल होण्याची शक्यता आहे.