Special Story : राजकारणापासून लांबच राहायचे महेंद्रसिंह टिकैत; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी एक काळ गाजवला होता…

नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलन चांगलेच गाजतेय. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासोबत राकेश टिकैत यांचे नावही चांगलेच गाजते आहे. राकेश जरी आज चर्चेत असले तरी त्यांचे पिता आणि शेतकऱ्यांचे एक बडे नेते व बलियान खापचे चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांनी एक काळ गाजवला होता.

लाखो शेतकरी त्यांचे अनुयायी होते. राजकारणात ते सहज मोठ्या पदापर्यंत पाहोचू शकले असते. मात्र त्यांनी स्वत:ला राजकारण आणि राजकीय नेत्यांपासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले. हेच त्यांचे वेगळेपण आणि ताकदही होती. ते स्वत:ला फक्त शेतकऱ्यांचा नेता मानायचे. अन्य कशात त्यांना स्वारस्य नव्हते. नेत्यांना त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यासपीठापासून लांबच ठेवले.

Image result for mahendrasingh tikait

त्याचाही एक किस्सा सांगितला जातो. एकदा माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांच्या पत्नी गायत्रीदेवी व त्यांचे पुत्र अजितसिंह महेंद्रसिंह टिकैत यांना भेटायला आले होते. भेटीचा कार्यक्रम झाल्यावर गायत्रीदेवी आणि अजितसिंहही व्यासपीठाकडे चालू लागले. मात्र टिकैत यांनी त्यांना तेथेच रोखले. कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या व्यासपीठावर प्रवेश नसेल असे त्यांनी स्पष्ट शब्दांत त्यांना सांगितले.

महेंद्रसिंह मोठे नेते होते व त्यांचा दबदबाही खूप होता. मात्र त्यांची भेट अगदी सहज आणि अनौपचारिकपणे होत असे. हल्लीची समाजमाध्यमे त्यावेळी नव्हती. मात्र टीव्ही, चित्रपटांचा त्यांना तिटकारा होता. मात्र शोले हा त्यांच्या अत्यंत आवडीचा चित्रपट होता व असंख्य वेळा त्यांनी तो पाहिलाही होता. त्या चित्रपटाला ते ना म्हणत नसत.

Image result for mahendrasingh tikait

वयाच्या केवळ आठव्या वर्षी ते त्यांच्या खापचे चौधरी झाले. मात्र खासगी जिवनात त्यांनी खापपण जपले. त्यांना प्रेमविवाहाच्या प्रकाराची चीड होती. जाट समाजाचे ते बडे नेते होते. त्यामुळे त्या नियमांनुसार त्यांचे आचरण असायचे.

महेंद्र सिंह टिकैत यांना राजकारणाशी सोयरसूतक नव्हते. मात्र त्यांचे पुत्र आणि आता शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राकेश मात्र राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी दोन वेळा लोकसभाही लढवली आहे.

Image result for mahendrasingh tikait

तुम्ही या, पण कॉंग्रेसचा झेंडा नको
1987 मध्ये वीजबिलाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहुदूर सिंह यांनी महेंद्र टिकैत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सिसौली या गावी येण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्याला तेथे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करायची असल्याचे सिंह म्हणाले. टिकैत यांनी त्यांना सशर्त परवानगी दिली. तुम्ही या, पण तुमच्या कॉंग्रेस पक्षाचा झेंडा अथवा एकही कार्यकर्ता सोबत नको अशी मुख्य अट होती. त्यानुसार वीर बहादूर सिंह तेथे आले.

Image result for mahendrasingh tikait

मात्र त्यांच्या स्वागतासाठी कोणीही फिरकले नाही. तसेच सभेच्या वेळी त्यांनी पाणी मागितले. तेव्हा ओंजळभर पाणी त्यांच्यासाठी एका शेतकऱ्याने आणले. हा आपला अपमान आहे असे वाटल्यामुळे वीर सिंह तडक तेथून परत फिरले.

नंतरच्या काळात मायावती मुख्यमंत्री असतानाही त्यांनी टिकैत यांच्या अटकेसाठी पूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. मात्र टिकैत यांच्याभोवती असलेले शेतकऱ्यांचे कवच पोलीस भेदू शकले नाहीत. नंतर टिकैत यांनीच आत्मसमर्पण केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.