कोल्हापूर | 19 मार्चला स्वाभिमानी शेतकरी संघटना रोखणार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग – राजू शेट्टी

कोल्हापूर – लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 मार्च रोजी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करा, अशी मागणी करत आहोत. मात्र राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत द्यायला पैसे नाहीत. लॉकडाऊनची भिती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून सर्व पक्षीयांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, संदीप कारंडे, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, रमेश भोजकर, अविनाश मगदूम, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.