एकरकमी FRP न दिल्यास हरामखोरांचे पुतळे जाळू – राजू शेट्टी

इस्लामपूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतपत कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. बाकीच्या कारखानदारांना धाड भरली की मस्ती आली आहे ? चोरांनी एकरकमी एफआरपी दिली नाहीतर हरामखोरांचे पुतळे जाळून हिसका दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा सज्जड दम माजी खा.राजू शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टी म्हणाले, “कडकनाथ घोटाळा हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा उत्तम नमुना आहे.” येडेमच्छिंद्र (ता. वाळवा ) येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी रात्री कृषी कायद्याच्या विरोधात आयोजित सभेत बोलत होते.

राजू शेट्टी पुढे म्हणाले ,” केंद्र सरकार शेतकऱ्यांला अंबानी व अदानीचे गुलाम करण्यासाठी शेतकरी विरोधी कायदा संसदीय परंपरा मातीत घालून शेतकऱ्यांवर लादत आहे. भाजप मित्र पक्षाचे तथाकथित शेतकरी नेते चित्रपट व तमाशाचा आधार घेत सुपारी घेऊन शेतकरी विरोधी कायद्याचे समर्थन करीत आहेत. त्यांचा हेतू सफल होवू देणार नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर चळवळीत जिवंत आहे.त्यामुळे शेतकरी हिताची वकिली मी करत राहीन.”

शेतकऱ्यांची मागणी नसताना कृषी कायदे लादण्यात आले. या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध समजून घेण्याऐवजी केंद्र सरकार आंदोलनाला जातीय व प्रांतिक रंग देत आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानवादी ठरविण्यात येत आहे.

गेली ३१ दिवस शेतकरी दिल्लीत आंदोलनाची ही लढाई सुरु आहे. लॉकडाउनच्या काळात अंबानी-अदानीसांरख्या उद्योजकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच नव्या कृषी कायद्यांची निर्मिती करण्यात आली आहे.संसदेत कोणताही कायदा संमत करताना तीन ते चार वर्षे कालावधी लागतो. केंद्र सरकारने जून मध्ये अद्यादेश काढून ऑगस्ट मध्ये कायदा केला. या विरोधात संसदेत आवाज उठवला जाईल म्हणून कोरोनाच्या कारण पुढे करत हिवाळी अधिवेशन रद्द केले. संसदीय परंपरा मातीत घालून हा कायदा शेतकऱ्यांवर लादला आहे.शेतमाल उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांसाठीच हे कायदे घातक असून, त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे.

ऍड. एस.यु. संदे म्हणाले,”केळ आणि रताळ यातील फरक माहीत नसणाऱ्यांनी आमची माप काढू नयेत. आमची छाव्यांची संघटना आहे. एफआरपीचा शब्द फिरवला तर हातात उसाचे दांडके घेऊ. वाळवा तालुक्यातील कोंबड्यांचे नेतृत्व केलेल्या बोक्याचे खुराड्यातील राजकारण संपविल्याशिवाय राहणार नाही.

जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले, केंद्रातील सरकारने गहू तांदूळ मका सोयाबीन तूरीचा किमान हमी भाव काढला आहे. त्यामुळे ऊसाचा ही एफआरपी केव्हाही काढू शकतात. आपला ऊस दर मागण्याचा नैतिक अधिकार हिरावला जाऊ शकतो. भाजपने २०१४ व २०१९ निवडणुका अंबानी व अदानीच्या पैशांवर जिंकल्या आहेत.राजू शेट्टी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली तर जशाच तसे उत्तर देऊ.
वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, मधुकर पाटील, संतोष शेळके, मधुकर डिसले, प्रकाश देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस खात्यातील झारीतील शुक्राचार्य कोण ?

शेतकऱ्यांची फसवणूक करणारे चोर उजळ माथ्याने फिरत आहेत मात्र स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतात.पोलिसांना विचारले तर वरून आदेश असल्याचे सांगितले जाते. मी गृहमंत्री, गृहराज्यमंत्राकडे विचारना केली त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यामुळे चोरांना सामील असलेला पोलीस खात्यातील झारीतील शुक्राचार्य कोण आहे असा सवाल खा.राजू शेट्टी यांनी केला.

उद्या रविवारी कडकनाथ संघर्ष यात्रा स्टेशन चौक सांगली येथून इस्लामपूर कडे येणार आहे. या यात्रेत कडकनाथचा आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन अध्यक्ष महेश खराडे यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.