पोपटाची मान पिरगळल्याशिवाय राक्षस मरणार नाही – राजू शेट्टी

कोल्हापूर – कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमा रेषेवर शेतकरी गेल्या 23 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र मोदी सरकारला अद्याप जाग आली नाही. हे कृषी कायदे उद्योगपतींच्या हिताचे आहे. यामुळे जोपर्यत पोपटाची मान पिरगळणार नाही, तोपर्यत राक्षस मरणार नाही, असा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्‌टी यांनी हल्लाबोल केला.

राजू शेट्‌टी म्हणाले, पंजाबसारख्या राज्यात अदानी आणि अंबानी यांच्या कंपनीतर्फे मोठ-मोठ्या गोदामांचे काम सुरू आहे. कृषी कायदे पास होण्याच्या आधीपासूनच ही तयारी सुरू होती. त्यामुळे या उद्योगपतींनीच कायद्याचा ड्राफ्ट तयार केला आणि सरकारला पास करायला लावला, हे स्पष्ट असल्याचे दिसून येते.

सुगीच्या काळात धान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते साठवून ठेवायचे आणि तेच धान्य सुगी संपल्यानंतर दर वाढवून ग्राहकांना विकायचे हे सगळं कारस्थान आहे. यामुळेच या अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना आणखी काय हवं आहे, हे विचारणार असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे.

अंबानी-अदानी तुमच्याकडे इतकं सगळं असताना आमच्या हातात जमिनीचा एक तुकडा राहिला आहे, तो सुद्धा हिसकावून घेणार आहात का, तुमची भूक आहे तरी किती? आम्हाला गुलाम बनवणार आहात का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे यांच्या विरोधातच मंगळवारी उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयापासून अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.