अशोक गेहलोत यांच्या नावावर सहमती?

नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्‍यता आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला आहे. अनेक दिवसांपासून कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र राहुल यांनी उत्तरदायित्वाच्या भावनेतून राजीनामा परत घेण्यास नकार दिला आहे. मात्र आपण कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते राहू आणि सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेससोबत लढा देत राहू, असे राहुल गांधी यांनी सांगितलेले आहे.

आता कॉंग्रेस मुख्यालयात असे बोलले जाऊ लागले आहे की, बऱ्याच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना गेहलोत कॉंग्रेसचे पुढील अध्यक्ष झाले तर काही हरकत असणार नाही. कॉंग्रेस अध्यक्ष असताना गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहात राहण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.

राजस्थानचे मुख्यमंत्रिपद आणि कॉंग्रेसचे अध्यक्षपद दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे ठेवण्याबाबत काही लोक भुवया उंचावत आहेत. याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की असा प्रकार अनेक व्यक्ती आणि राज्यांच्या बाबतीत घडत आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती तसेच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. राहुल गांधी यांनी राजीनामा परत घेण्यास नकार दिल्यानंतर कॉंग्रेसला पर्याय व्यक्तीबाबत विचार करावा लागत आहे. गांधी कुटुंबातील सदस्यसुद्धा गेहलोत यांच्या नावाबाबत समाधानी असल्याचे बोलले जाते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×