पुणे – उधारीच्या पैशावरुन एका तरुणावर कोयत्याने वार करत दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना मांजरी खुर्द गावचे हद्दित स्मशानभुमीजवळ घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
विकास लक्ष्मण सोनवणे (32 रा मांजरी, खु.ता हवेली, जि.पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर हेमंत मोरे, गोविंद बनसोडे, सोन्या मोरे, शुभम गायकवाड व नाना महाले (सर्व रा.मांजरी खु.ता हवेली जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल गायकवाड याने हेमंत मोरे यास दिलेल्या उसन्या पैशावरुन झालेल्या भांडणातुन विकास सोनवणे याचा खून करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी माऊली सोमनाथ मुरकुटे (29 धंदा शेती रा.इंदिरानगर, मांजरी खुर्द ता.हवेली) यांचे विकास लक्ष्मण सोनवणे(32) हे नात्याने मामे सासरे असुन ते त्यांचे कुंटुंबासह शेजारीच राहण्यास आहेत. रविवारी रात्री फिर्यादी माऊली आणि विकास सोनवणे हे मित्र सौरभ साळुके याचे घरी माळवाडी आव्हाळवाडी रोड येथे त्याचे लग्नाच्या पुजेकरीता गेले होते.
तेथे विकास सोनवणे यास अमोल गायकवाड याचा फोन आला व त्याने सांगितले की गावात हेमंत मोरे याचे सोबत भांडण झाली आहेत. तो माझे उसने घेतलेले पैसे देत नाही त्याला समजुन सांग तु लवकर ये असे म्हणाला. त्यानूसार ते तेथे गेल्यावर हेमंत मोरे, गोविंद बनसोडे व विकास सोनवणे यांची आपसात शिवीगाळ व हाताने हाणामारी सुरु झाली. त्यानंतर गोविंद तेथुन पळुन गेला त्याचे पाठीमागे विकास पळत गेला व त्याने हातात दगड उचलले तसेच हेमंत मोरे याने त्याचा पुतन्या सोन्या मोरे यास आवाज देवुन कोयते घेवुन येण्यास सांगितले.
त्यानंतर सोन्या लगेच पळत जावुन दोन कोयते घेवुन आला. त्याचेकडील एक कोयता हेमंत मोरे याने घेतला तर दुसरा कोयता गोविंद बनसोडे याचेकडे दिला. हेमंत मोरे याने विकास याचे तोंडावर कोयत्याने वार केला, त्यानंतर गोविंद बनसोडे याने देखील विकास यास कोयत्याने मारण्यास सुरुवात केली.
तेवढयात सोन्या मोरे याने दगड घेवुन येऊन विकास यास दगडाने मारले. त्यानंतर विकास हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर विकास मृतावस्थेत आढळला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.