बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्याने पर्वती मतदारसंघात “इच्छुकां’चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तीनचा प्रभाग, आरक्षण कुठे-कसे या मुद्द्यांवर चर्चा जोर धरू लागलेली असताना. दिवाळीचा मुहूर्त साधत अनेकांनी सरंजाम दिवाळी किट वाटपासह हेलिकॉप्टर राइडपर्यंतचे उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे निवडणूक येता… दिवाळी गिफ्ट येई दारी… असा सुखद अनुभव नागरिक घेत आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भाषणबाजी सुरू झाली नसली तरी “कामाला लागा’ असे आदेश आले आहेत. त्यामुळे दीपोत्सवात प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आजी-माजी आणि जुन्या-नव्यांची लगबग सुरू झाली आहे. करोना, लॉकडाऊन अशा दोन वर्षांच्या अडचणीतून अनलॉकनंतर पहिल्यांदाच दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करता येत आहे. त्यातही आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांना निवडणुकीच्या आधी आलेली दिवाळी “गोड’ झाली आहे.
पर्वती मतदारसंघात तर किराणा वाटप, मिठाई वाटप, फराळ वाटप, पणत्या, उटणे वाटप, साड्या वाटप यासह अभ्यंगस्नान ते हॅलिकॉप्टर राइड असे उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे सामान्य नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी होत आहे.
निवडणूक आली वाटतं…
एका कार्यकर्त्याने परिसरात साड्या वाटपाचा कार्यक्रम घेत जागोजागी अनधिकृत फ्लेक्स लावत प्रसिद्धी केली. यापूर्वीही भाजीवाटप सारखे कार्यक्रम घेऊन मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सोसायटी पदाधिकारी व काही घरांतील नागरिकांनी “निवडणूक जवळ आली वाटत’ असा प्रश्न विचारल्याने या उपक्रमांवर “पाणी’ फिरले तर एका ठेकेदाराने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करीत पालिकेच्याच कामांविरोधात आंदोलने करण्याचा पवित्रा घेतला असल्याने पालिका अधिकारी व नगरसेवकांची करमणूक होत असून यामध्ये याच ठेकेदाराने यापूर्वी केलेल्या कामांचा समावेश असल्याचे चांगलीच चर्चा रंगत आहे.
आम्ही त्यांनाच साथ देणार…
एकीकडे मतदारसंघात इच्छुकांचे उपक्रम वाढत असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सामाजिक काम करणारे, करोना काळात नागरिकांना मदत करणारे, शासकीय योजना मिळवून देणारे, मूलभूत समस्या सोडविणारे आणि सामान्यांची जाण असलेल्या उमेदवारांनाच आम्ही साथ देणार, असे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे दिवाळीचा मुहुर्त साधून राबविण्यात येणारे उपक्रम “इच्छुकांना’ फायदेशीर याबाबत शंकाच आहे.