पुणे – अनैतिक संबंधाच्या संशयावरून वस्तराने गळ्यावर वार करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
राजू विक्रम मानवतकर (वय 32, रा. कोथरूड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत प्रशांत सुरेश जगधने (वय 23, रा. वडगावशेरी) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.यू.चांदणे यांनी मदत केली.
ही घटना 27 जानेवारी 2018 रोजी रात्री 1 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास वडगावशेरी भागात घडली. मानवतकर याने घरासमोर उभारलेल्या फिर्यादीला शिवीगाळ केली. महिलेशी शरीरसंबंध का ठेवतो, असे म्हणत वस्तराने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चंदननगर पोलिसांनी 307 (खूनाचा प्रयत्न) नुसार दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, न्यायालयाने 323 (गंभीर मारहाण) नुसार शिक्षा सुनावली.