IMP NEWS : संसर्ग वाढू नये म्हणून कडक निर्बंध; नियमांचे उल्लंघन झाल्यावर होणार गुन्हे दाखल, जाणून घ्या नवीन नियमावली

- जिल्हा प्रशासन सतर्क - लग्न समारंभांना फक्त 50 जणांनाच परवानगी - गर्दी होणाऱ्या खासगी व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी अनिवार्य - नियमांचे उल्लंघन झाल्यावर होणार गुन्हे दाखल

पुणे – जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क होत लॉकडाऊनमधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विवाहांना फक्त 50 जणांचीच उपस्थिती, हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर अशा अनेक निर्बंधाचा त्यात समावेश आहे.

जर आस्थापनांकडून तसेच मंगल कार्यालयांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास नोटीस बजावून दंड वसूल करण्यात यावा. जर दुसऱ्या वेळेस संबधित मंगल कार्यालये, हॉल अथवा आस्थापनांकडून अशा प्रकारचे नियमांचे उल्लंघन झाल्यास 15 दिवस सील करण्याची कार्यवाही करोन संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून पहिल्या वेळी 500 रुपयांचा दंड व पुन्हा आढळ्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून हे सर्व आदेश तात्काळ लागू करण्यात आले आहेत.

मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्‍लासेस, शाळा, महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी करण्यात यावी. तसेच या ठिकाणी शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील.

तर संबधित आस्थापना अथवा संस्थेंवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, पोलिस निरिक्षक, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.