Pune Bribe Case : निरीक्षकासह ‘त्या’ तीन्ही पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलीस कोठडी

पुणे – न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन अर्जात पुन्हा म्हणणे सादर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक निरीक्षक प्रफुल्ल कदम आणि कर्मचारी महेश दौंडकरला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याने यापूर्वी अडीच लाख रुपये लाच स्विकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शनिवारी (दि. 6) दुपारी सव्वातीन वाजता कामशेत पोलीस स्टेशनमध्ये एसीबीने ही कारवाई केली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना 21 फेब्रुवारी रोजी फसवणूक प्रकरणी अटक झाली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयाने सुरुवातीला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

वडगाव मावळ न्यायालयात जामिनसाठी मदत करण्यासाठी पोलिसांनी अडीच रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी 23 फेब्रुवारी रोजी अडीच लाख रुपये दिले. मात्र पोलिसानी जामीन मिळवून देण्यासाठी काहीच मदत केली नाही. पुणे येथील सत्र न्यायालयात नेवाळे यांचा जामीन असल्याने मदत करतो, असे म्हणत पुन्हा अडीच लाख रुपये रुपयांची करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याबाबत तक्रारदार मावळ पंचायत समितीचे उप सभापती दत्तात्रय शेवाळे यांनी एसीबी पुणे कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी रोख रक्कम एक लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान तिघांना न्यायालयत हजर करण्यात आले. त्यावेळी या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करण्यासाठी संबंधित तीन्ही पोलिसांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सहायक जिल्हा सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. प्रताप परदेशी यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.