… जिगरबाज पोलिसामुळे टळली मोठी दुर्घटना

पुणे – एका जिगरबाज पोलिसामुळे ज्येष्ठ महिलेच्या घरी होणारी मोठी दुर्घटना टळली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने जीवाची पर्वा न करता तळमजल्याच्या खिडकीवरून पहिल्या मजल्यावर उडी घेतली. यानंतर भेदरलेल्या अवस्थेत गॅलरीत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेला धीर दिला. तसेच समयसुचकता दाखवत कमरेच्या बेल्टच्या सहाय्याने घराचा दरवाजा उघडला. यानंतर घरातील गॅस व त्यावरील कुकर बंद करून होऊ पहात असलेली दुर्घटना टळली. त्यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर कोणत्याही क्षणी कुकर आणि सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.

यासंदर्भात सविस्तर असे की, रास्तापेठेतील युनिटी कॉम्पलेक्‍समध्ये रजनी समीर झेंडेवाले ही ज्येष्ठ महिला पती व मुलांसमवेत राहते. गुरुवारी दुपारी 12.30 वा. सुमारास त्या सदनिकेचा दरवाजा आतून लॉक करून किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. गॅसवर कुकरमध्ये वरण भात लावून त्या गॅलरीत पर्स अडकवण्यासाठी गेल्या. त्याचवेळी गॅलरीचा दरवाचा अचानक लॉक झाला. पावसामुळे दरवाजा फुगला असल्याने प्रयत्न करुनही त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता.

दरम्यान, किचनमध्ये गॅसवर लावलेल्या कुकरच्या 10 ते 12 शिट्टया झाल्या होत्या. यामुळे कुकरमधील भात जळून त्याचा वास सर्वत्र पसरला होता. यामुळे गॅस लवकरात लवकर बंद करणे आवश्‍यक होते. तो बंद न केल्यास कोणत्याही क्षणी कुकर आणि सिलेंडरचा स्फोट होण्याचा धोका होता. यातच ज्येष्ठ महिला गॅलरीत अडकल्याने त्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला होता. यामुळे ज्येष्ठ महिलेने गॅलरीतून मदतीसाठी लोकांचा धावा सुरू केला.

मात्र, त्यांच्या सदनिकेचा दरवाजा बंद होता. तसेच घरातून कुकरचा वास येत असल्याने सिलेंडर गळती झाल्याच्या भीतीने कोणीही पुढे येण्याचे धाडस करत नव्हते. दरम्यान, समर्थ पोलीस ठाण्यातील शिपाई नीलेश साबळे व अनिल शिंदे हे तेथे पोहोचले. त्यांना गॅलरीतून मदतीसाठी हाका मारणाऱ्या रजनी दिसल्या.

ज्येष्ठ महिलेला वाचवण्यासाठी केले धाडस

ज्येष्ठ महिलेचा जीव धोक्‍यात असल्याचे लक्षात येताच साबळे यांनी तळमजल्यावरील खिडकीला लावलेल्या एसीच्या बॉक्‍सवर पाय ठेवला. त्यावरून सदनिकेचा स्लॅप हाताने पकडून रजनी यांच्या गॅलरीत प्रवेश केला. त्यांनी प्रथम ज्येष्ठ महिलेला धीर दिला. गॅलरीत पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला नाही. यामुळे साबळे यांनी कमरेचा बेल्ट दरवाजाच्या कडीला गुंडाळून ताकदीने हिसका मारून दरवाजा उघडला. यानंतर प्रथम रजीन यांना गॅस बंद करायला लावले. कुकर किमान दोन ते तीन तास उघडू नका, अशा सूचना देऊन ते तेथून निघून गेले. त्यांच्या या धाडसाने रजनी आणि त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात येऊन आभार मानत कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.