सुरूवातीला हडपसर भागातील वकिलांना देण्यात येणार मदत
पुणे प्रतिनिधी – जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनतर्फे पाच वर्षापेक्षा कमी प्रॅक्टीस असलेल्या वकिलांना उद्यापासून (दि.10) अन्नधान्य आणि किराणा असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. हडपसर भागातून मदत देण्यात सुरूवात होणार असून, त्या भागातील असलेले बारचे उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे आणि माजी उपाध्यक्ष ऍड. रवी लाढाणे यांच्यावर वाटपाच्या नियोजनाची जबाबदारी आहे.
सुमारे साडेचारशे गरजू ज्युनिअर वकिलांनी मदतीसाठी बारकडे संपर्क केला असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन पुकारला आहे. परिणामी, सर्व न्यायालय बंद आहेत. पाच वर्षापेक्षा कमी प्रॅक्टिस असलेल्या वकीलांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे. सुरुवातीला ज्यनिअर वकिलांकडे फारशी कामे नसतात. त्यांना सीनियर वकील मदत करत असतात. या पार्श्वभूमीवर ज्युनिअर वकिलांना गुजराण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे बारकडून ही मदत करण्यात येत आहे. उपाध्यक्ष योगेश तुपे, सचिन हिंगणेकर, सचिव घनश्याम दराडे, विकास बाबर, खजिनदार भाग्यश्री गूजर -मुळे, हिशेब तपासणीस ओंकार चव्हाण आणि बारच्या सर्व कार्यकारणीकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे.
अध्यक्षांनी दिले 2 लाख रुपये….
या उपक्रमासाठी आतापर्यंत वकिलांनी सुमारे साडे-पाच लाख रुपयांची मदत केली आहे. अधिकाधिक वकिलांनी मदत करावी, असे आवाहन पुणे बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांनी या आपतकालीन परिस्थितीच्या लढ्यासाठी स्वत: 2 लाख रुपये दिले आहेत. त्यांनी दिलेल्या रक्कमेमुळे आपतकालीन निधी साडेसात लाखापर्यंत पोहोचला आहे.