इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : प्रजनेशची घोडदौड खंडित

इंडियन वेल्स – प्रजनेश गुन्नेश्‍वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल इवो कार्लोविचविरुद्ध पराभूत झाल्यामुळे खंडित झाली आहे. भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेशनला क्रोएशियन खेळाडूविरुद्ध 3-6, 6-7 (4-7) ने पराभव स्वीकारावा लागला. ही लढत एक तास 13 मिनिटे रंगली.

जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या टेनिसपटूंना पराभवाचा धक्का देत इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारणाऱ्या प्रजनेश गुन्नेश्‍वरनची विजयी घोडदौड इव्हो कार्लोविचने जरी खंडित केली असली तरी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या खेळाडूंना पराभूत करू शकतो, हा आत्मविश्‍वास प्रजनेशला मिळाला आहे.

पात्रता फेरीतून तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या प्रजनेशला 1 तास 13 मिनिटे रंगलेल्या लढतीत क्रोएशियाच्या कालरेव्हिचने 3-6, 6-7 (4) असे पराभूत केले. या सामन्यात तब्बल 16 वेळा बिनतोड सर्व्हिस टाकणाऱ्या कार्लोविचच्या सर्व्हिस परतवून लावणे, हेच माझ्यासाठी कठीण होते. माझ्याही वाट्याला काही संधी आल्या होत्या, मात्र, मला त्याचा फायदा उठवता आला नाही. त्याच सर्व्हिस सामन्यात निर्णायक ठरल्या. मला दोन वेळा कार्लोविचची सर्व्हिस भेदण्याची संधी होती, मात्र मला ते जमले नाही असे प्रजनेशने सामन्यानंतर बोलताना सांगितले.

एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य फेरीत पहिल्यांदाच खेळणाऱ्या प्रजनेशने अप्रतिम कामगिरीची नोंद करताना 61 रॅंकिंग गुणांची कमाई केली. त्यामुळे प्रजनेश एटीपी टेनिस क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम 82व्या स्थानी मजल मारली आहे. तो म्हणाला, या स्पर्धेतील माझी कामगिरी एकूणच चांगली झाली. अशा प्रकारची कामगिरी मी पुन्हा करू शकतो, हे बळ मला मिळाले आहे. वेळ आल्यावर तुम्हाला ते कळेलच. येत्या काळात मी माझ्या कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आहे. आता प्रतिष्ठेच्या स्पर्धांवर मी लक्ष केंद्रित करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.