पुणे – पूजा चव्हाण आणि बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे बार असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य ऍड. रमेश खेमू राठोड यांनी केली. याबाबतचे निवेदन वानवडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. तर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री, केंद्रीय, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त आणि गृहसचिवांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
तरूणीने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचे फोटो, ऑडिओ क्लिप, व्हिडीओ सोशल मिडीया आणि इतर ठिकाणी प्रसारीत करून मृत्यूनंतरही तिची बदनामी करण्यात येत आहे. राजकारणाची पोळी भाजण्यासाठी अनेकांकडून मोर्चे काढण्यात येत आहेत. आंदोलने करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून पीडितेचे माहिती उघड करण्यात येत आहे. तिचा गर्भपात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आई-वडिलांची नाहक बदनामी होत आहे. त्यांना नातेवाईकांमध्ये फिरणे अवघड बनले आहे.
बदनामी न थांबल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याचे आई-वडिलांकडून बोलण्यात येत आहे. यांचा गांभीर्याने विचार करून बदनामी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे ऍड. राठोड यांनी म्हटले आहे.