पुणे- महापालिकेच्या अभियांत्रिकी संवर्गातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्याच्या मनमानी बदल्यांना आता चाप बसणार आहे.
या अभियंत्यांच्या बदल्या विभाग प्रमुखांना न विचारता कोणत्याही स्थितीत परस्पर केल्या जाऊ नयेत. तसेच, बदली केलेल्या कर्मचाऱ्याच्या मोबदल्यात इतर विभागांतील कोणताही कर्मचारी संबंधित विभागास उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. त्यासोबतच महापालिका निवडणुकांचे कामकाज सुरू झाल्याने अचानक या स्थानिक भागाची माहिती असलेल्या अभियंत्याची बदली केल्यास त्याचा निवडणुकीच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत महापालिकेत नव्याने रूजू होणाऱ्यासह इतर अभियंत्यांकडून बदलीसाठी राजकीय हस्तक्षेपाचा वापर केला जात आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागावर दबाव आणत अभियंत्यांच्या बदल्या चक्क क्षेत्रीय अधिकारी स्तरावरून करून घेतल्या जात आहेत. त्याची कल्पना वेतन इतर विभागातून काढण्याची वेळ आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागास दिली जाते. तर, अनेकदा थेट माननीयांना सोबत घेऊनच बदली हातोहात करून घेतली जाते. त्यामुळे सरळसरळ प्रशासकीय नियमांनाच बदलीसाठी हरताळ फासला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला मर्जीतील अभियंत्यांना आपला प्रभाग मिळवून देण्यास त्यांची बांधकाम तसेच कोट्यवधींचे मोठे प्रकल्प सुरू असलेल्या प्रकल्प वर्णी लावण्यासाठी दबाव आणला जात आहे.
हे प्रकार वारंवार वाढतच असल्याने अखेर महापालिका आयुक्तांनीच याची गंभीर दखल घेत या पुढे सामान्य प्रशासन विभाग तसेच विभाग प्रमुखांची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही अभियंत्यांच्या बदल्या केल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट आदेश काढत बदल्यांमधील या राजकीय हस्तक्षेपाला आळा घातला आहे.