पुणे –महावितरणकडून मिळणारी वीज परवडत नसल्याने महापालिकेकडून खुल्या बाजारातून सौरऊर्जेवरील वीज विकत घेतली जाणार आहे. एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील कंपनीची उपकंपनी असणाऱ्या कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस कंपनीबरोबर (सीईएसएल) स्पेशल पर्पज व्हेरईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासाठी आणि त्यांच्याकडून स्वस्त दरातील वीज खरेदी करायला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
पुण्यापासून 314 किलोमीटरवर असलेल्या उस्मानाबाद येथून वीज पुण्यात आणण्यात येणार असून या प्रकल्पासाठी अडीचशे कोटींचा खर्च एसपीव्हीच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र, एवढा घाट घातल्यानंतरही महापालिकेस प्रतियुनिट केवळ 76 पैशांचा फायदा होणार आहे.
रासने म्हणाले की, या प्रकल्पाच्या एकूण खर्चाची विभागणी 80 टक्के कर्जाद्वारे आणि 20 टक्के समभाग अशी आहे. 20 टक्के समभागापैकी किमान 26 टक्के समभाग खर्च महापालिकेला आणि 74 टक्के समभाग खर्च सीईएसएल कंपनीला करावा लागणार आहे. पन्नास किलोवॅटच्या प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये असणार आहे. त्यापैकी 10 कोटी 40 लाख ते 12 कोटी 48 लाख रुपये इतकी रक्कम महापालिकेने समभाग भांडवल म्हणून द्यावी लागणार आहे. निर्माण झालेल्या विजेपैकी 51 टक्के वीज पुणे महापालिकेने वापरणे आवश्यक राहणार आहे.
“एसव्हीपी’बरोबर करार
सध्या सर्व खर्च धरून 7 रुपये 23 पैसे प्रति युनिट दराने वीज खरेदी केली जाते. एसपीव्हीद्वारे खुल्या बाजारपेठेत 3 रुपये 40 पैसे दराने वीज उपलब्ध होणार आहे. इतर शुल्काचा एकत्रित विचार करता ही वीज सध्याच्या दरापेक्षा प्रति युनिट 76 पैशांनी बचत होऊ शकणार आहे. शिवाय, एसव्हीपीबरोबर करार करून सध्याच्या दरांपेक्षा कमी दरात वीज मिळणार असून, हे दर वीस वर्षांसाठी कायम असणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी महापालिका ही वीज महावितरणच्या ग्रेड वहनमधून आणणार आहे. त्यामुळे भविष्यात महावितरणने या वीज वहनाचे दर वाढविल्यास महापालिकेस ही अवघ्या 76 पैशांच्या बचतीची वीज परवडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.