जीएसटी भरू नका, मोदीही तुमच्या दारात येतील; पंतप्रधानांचे बंधु प्रल्हाद मोदींचेच व्यापाऱ्यांना आवाहन

मुंबई – लॉकडाऊन आणि करोनामुळे सगळ्याच ठिकाणचे व्यापारी अडचणीत आले आहेत, त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही या व्यापाऱ्यांच्या समस्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधु प्रल्हाद मोदी यांनी एक अनोखी सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आपल्या मागण्या पुर्ण होईपर्यंत व्यापाऱ्यांनी जीएसटीच भरू नये. असे केले तर उद्धव ठाकरेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा तुमच्या दारात येतील असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचे बंधु प्रल्हाद मोदी हे देशभरातील रास्तभाव दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. या नात्याने उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी ते म्हणाले की व्यापाऱ्यांनी आता एकीचे बळ दाखवण्याची गरज आहे. आता व्यापाऱ्यांनी लढायला शिकले पाहिजे. आणि लोकशाहीवादी देशात राहतो, हुकुमशहाच्या देशात राहात नाही. व्यापाऱ्यांनी जीएसटी भरणे बंद केले तर सरकार ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी चहावाले नाहीत !
पंतप्रधान मोदी यांनी देशाला आपण चहावाले आहोत असे वेळोवेळी सांगितले आहे. पण स्वत: पंतप्रधान मोदींनी कधीही चहा विकला नाही असे जाहीर वक्तव्य त्यांचे बंधु प्रल्हाद मोदी यांनी या कार्यक्रमात केले. ते म्हणाले कीे, आमचे वडिल चहा विकायचे, त्यांनी चहा विकून आम्हा सहा भावंडांना वाढवले.

आम्ही मुलांनीही चहा विकला पण पत्रकार मात्र नरेंद्र मोदी यांनाच चहावाला म्हणतात. नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणणे ही पत्रकारांची चूक आहे. जर काही म्हणायचेच असेल तर नरेंद्र मोदी यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा, पण त्यांनी चहा विकला नसल्याने त्यांना चहावाला म्हणू नका असेही प्रल्हाद मोदी यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.