पिंपरी : 1 मार्च रोजी मुंबई येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र एअर फायर आर्म्स कंपेटिशन फेब्रुवारी 2020-21 या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट प्रोमोशन फाऊंडेशन अंतर्गत असलेल्या अचिवर पिस्तूल व रायफल शूटिंग क्लबच्या 7 नेमबाजांनी 10 मी. एअर पिस्तूल व 10 मी. एअर रायफल या खेळात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे त्यांची येणाऱ्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल युथ गटात, ओम पोखरकर यांनी 364 गुणांसह सुवर्ण पदक, हर्षद नारायण पाडुळे यांनी 352, अक्षत अमीत घुबे 339 गुण मिळवले. तर, मुलींच्या युथ गटात श्रद्धा वाळेकर 333, नेहा देवकुळे 315, जुनिअर गटात सुकन्या जानकर यांनी 338 गुणांसह रौप्य पदक मिळविले. तसेच 10 मीटर एअर रायफल युथ गटात राजनंदिनी जितेंद्र यादव 328 गुण मिळविले. याच कामगीरीवर या सर्वांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले आहे.
या खेळाडूंना आकुर्डी येथील अचिवर पिस्तूल व रायफल शूटिंग क्लब प्रमुख प्रशिक्षक अरुण सुभाष पाडुळे व अकादमी मधील प्रशिक्षक समिता गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सात नेमबाज राष्ट्रीय पातळीवर पोचले आहेत. प्रशिक्षक अरुण पाडुळे स्वतः भारतीय टीम निवड चाचणी खेळत आहेत.