पिंपरी : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे पोलिस नंबर टिपून घेतात. त्यानंतर त्यांना दंड भरण्यासाठी पत्रही पाठवितात. मात्र या पत्राकडे अनेकजण दुर्लक्ष करून दंडही भरत नाहीत. अशा वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम राबविली. 623 वाहन चालकांकडून पोलिसांनी दंड वसूल केला.
सिग्नल तोडणे, ट्रीपल सीट जाणे, नो-एन्टीतून जाणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेट न घालणे, अशा प्रकारे वाहन चालकांकडून वाहतूकीचे नियम भंग केले जातात. यापैकी काही वाहन चालकांकडून जागेवरच दंड वसूल केले जात नाही. त्यांचे वाहनांचे नंबर पोलिस टिपून घेतात आणि नंतर त्या वाहन मालकाला पत्र पाठवून दंड भरण्यास सांगितले जाते. नागरिकांचा वेळ वाचावा, अशी त्यामागचा हेतू असतो. मात्र बहूतांश वाहन चालक पोलिसांनी पाठविलेल्या पत्राकडे दुर्लक्ष करीत दंड भरत नाहीत. अशा वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त निलिमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी शनिवार (ता. 10) आणि रविवारी (ता. 11) विशेष मोहिम राबविली.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई
पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 123 जणांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांवर खटला दाखल करून न्यायालयात पाठविण्यात येते. न्यायालय अशा वाहन चालकांना अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करते. तसेच काही वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवानाही न्यायालय रद्द करते.
“पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांच्या दहा चौक्या आहेत. प्रत्येक पोलिस चौकीच्या हद्दीत एक याप्रमाणे दहा पथकांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. या नाकाबंदीत ज्या वाहन चालकांना दंड आकारला आहे मात्र त्याने तो भरलेला नाही, अशा 623 वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. यापुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई करण्याचे नियोजन आहे.”
-प्रसाद गोकुळे, पोलिस निरीक्षक – वाहतूक नियोजन विभाग