पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने मोकळ्या मैदानात मंडई सुरू केल्या आहेत. मात्र व्यापाऱ्यांना स्वतःच्या डोक्यावरही छत्री उभारण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे व्यापाऱ्यांना महापालिकेने एकप्रकारे उन्हात उभे राहण्याची शिक्षा सुनावली आहे.
काळेवाडी चिंचवड पुलाजवळ चितराव गणपती मंदिरा शेजारील मोकळ्या मैदानात महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भाजी मंडई सुरू केली आहे. मात्र या मंडईत असलेल्या व्यापाऱ्यांना डोक्यावर छत्री देखील उभारण्यास महापालिकेने मनाई केली आहे. यामुळे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत उन्हात उभे राहून भाजी विक्री करावी लागत आहे.
राजकीय कुरघोड्या….
मोकळ्या जागेत मंडई उभारण्याबाबत महापालिकेने विविध सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र काही राजकीय व्यक्ती आणि नगरसेवक यांच्यातील कुरघोड्यांचे राजकारण व्यापाऱ्यांना भोवत आहे. येथील व्यापाऱ्यांना छत्री उभारण्याबाबत स्थानिक नगरसेवकाने परवानगी दिली होती. मात्र त्यांच्यात पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एका बड्या राजकीय नेत्याचे नाव सांगून व्यापाऱ्यांना छत्र्या काढून टाकण्याचे आदेश दिले.
भर उन्हात सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेमध्ये उभे राहून भाजी विक्री करणे शक्य नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय उन्हात भाजी खराब होत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर तोडगा न निघाल्यास आजारी पडण्यापेक्षा आम्हाला नाईलाजाने आमचा व्यवसाय बंद करावा लागेल, असा इशारा चिंचवड भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी दिला आहे.