नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 26 पैशांची, तर डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ केली. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल दराने शंभरी पार केली.
चालू महिन्यात 15 वेळा इंधन दरवाढ झाली. दरवाढीच्या सत्रामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नवनवे उच्चांक गाठत आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 100 रूपये 19 पैसे, तर डझेलचा दर 92 रूपये 17 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत ते दर अनुक्रमे 93.94 रूपयांवर आणि 84.89 रूपयांवर पोहचले आहेत.
चालू महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 3 रूपये 54 पैशांनी, तर डिझेल 4 रूपये 16 पैशांनी महागले. इंधन दरवाढीच्या सत्रामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही शहरांत याआधीच पेट्रोल दराने शंभरीचा टप्पा ओलांडला.
देशात राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात इंधन दर सर्वांधिक आहेत. त्या जिल्ह्यात पेट्रोलचा दर तब्बल 104 रूपये 94 पैसे इतका आहे. त्याशिवाय, डिझेलचा दरही (97.79 पैसे) शंभरीच्या घरात पोहचला आहे.