नवी दिल्ली, दि. 16 – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून, आज पेट्रोलचे दर 24 पैशांनी, तर डिझेलचे दर 27 पैशांनी वाढले. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा दर 99 रुपयांवर गेला आहे. तेथील नेमका दर आता 98 रुपये 88 पैसे इतका झाला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांत अनेक ठिकाणी या आधीच पेट्रोलचा दर शंभर रुपयांच्यावर गेला आहे. 4 मेपासून झालेली इंधनाच्या दरातील ही नववी वाढ आहे. त्याच्या आधी पाच राज्यांत निवडणुका असल्याने इंधनदरवाढ रोखून धरण्यात आली होती.
पण निवडणुका संपताच तेल कंपन्यांना पुन्हा इंधन दरवाढ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. 4 मेपासून झालेली दरवाढ लक्षात घेतली तर पेट्रोलच्या दरात 2 रुपये 19 पैसे, तर डिझेलच्या दरात 2 रुपये 49 पैसे इतकी वाढ झाली आहे.