विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष

शाळा, महाविद्यालयाच्या उपहारगृह, घरच्या डब्यालाही मार्गदर्शक तत्वे

पिंपरी – शाळा व महाविद्यालयामधील उपहारगृहामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे अन्न देण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना घरुन देण्यात येणाऱ्या डब्ब्यामध्ये कोणत्या प्रकारचे अन्न असावे, यासाठी आता नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे. उपहारगृह अथवा घरुन आणल्या जाणाऱ्या डब्यामध्ये पोषण आहार कसा आहे, याकडे या समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

अलिकडच्या काळात जंकफुड हे सगळ्यांच्याच जीवनशैलीचा भाग बनला आहे. त्यामुळे, जंकफुडचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांनी घरुन आणलेला डबा असो किंवा शाळा, महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये मिळणाऱ्या पदार्थामध्ये जंकफुडचा मोठ्या प्रमाणात समावेश दिसून येत आहे. याशिवाय आकर्षक जाहिरातींमुळे कमी किंमतीमधील पॅकींगमधील पदार्थ खाण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते त्यामुळे, घरी बनवलेले पदार्थ विद्यार्थी खात नाहीत. त्याचे दुष्परिणाम म्हणून आवश्‍यक कर्बोदके व प्रथिने मुलांना मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरिरावर दुष्परिणाम झालेले पहावयास मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळा व महाविद्यालयासाठी संपूर्ण वर्षभराचा पोषण आहार उपक्रम राबवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मुख्याध्यापक, प्राचार्य, आरोग्यसमिती, विद्यार्थी, पालक यांना पोषण आहाराचे महत्व सांगण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा अहवाल बनवल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून महाविद्यालयामध्ये दिलेल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांचा मेनूमध्ये बदल केला जाणार आहे.
-संजय नारगुडे, अन्न व औषध अधिकारी

या उपक्रमानुसार मुलांच्या पोषण आहारावर लक्ष ठेवण्यासाठी आता प्रत्येक शाळेमध्ये एक आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक असणार आहेत. या समितीच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयातील उपहारगृहामध्ये दिले जाणारे अन्न पदार्थ, भोजन विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी होईल, याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा पोषण अहार कसा असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने बनवलेल्या नियमावलीमध्ये जंकफुडचा प्रचार व प्रसार होणार नाही याची काळजीही समितीसोबत शाळांनी घ्यायची आहे. तसेच ज्या शाळेत मुले घरुन डबा आणतात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्‍वासात घेवून मुलांच्या आहारात पोषण आहाराचा समावेश करावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

शाळांना पत्र पाठवून मागितली माहिती

अन्न व औषध प्रशासन विभागाने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवून या उपक्रमाची माहिती दिली आहे. तसेच शाळेमध्ये आरोग्य समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच संस्थेमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या अन्न पदार्थांची माहिती सप्टेंबर महिन्यापर्यंत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवावी, असे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.