पंढरपूर – घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार असून दररोज 10 हजार भाविकांना मुख दर्शन मिळणार आहे. कोविड चाचणी गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच भाविकांना मंदीरात सोडले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासंदर्भात आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. विजया दशमी पासून सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे.
दर तासाला सातशे ते एक हजार भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था केली आहे. यामधे 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, दहा वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे.
दर्शनास येणाऱ्या भाविकांची करोना टेस्ट सक्तीची असणार नाही. मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच मंदिरांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.