पंढरपूर, दि. 26 (प्रतिनिधी) – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी व भाजपकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत.
तर दुसरीकडे अद्याप महाविकास आघाडीत चर्चासत्र सुरू आहेत. भाजपकडून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व कॉंग्रेस पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पंढरपुरातील पोटनिवडणुकीतील चित्र वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला उमेदवार निश्चित केला आहे. मात्र त्या उमेदवाराची उमेदवारी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कात्रीमध्ये अडकल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्री भालके व सुपुत्र भालके यांच्यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे.
विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी प्रचाराचा धडाका लावला. भगीरथ भालके यांनी 17 एप्रिलला आपल्याला मतदान करा, असे आवाहन करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार हा तुमच्या मनातील असणार असल्याचे सांगितले होते. मात्र भगीरथ भालके की जयश्री भालके यांच्या नावांची घोषणाही अद्याप झालेली नाही.