पालकमंत्रिपदासाठी दोन ‘भाऊ’ शर्यतीत

बाळा भेगडे, लक्ष्मण जगताप यांच्यात रस्सीखेच; गेली 25 वर्षे ‘कमळ’ फुलविणारा मावळ तालुका प्रबळ दावेदार

पिंपरी – पालकमंत्री गिरीश बापट यांनी लोकसभेचे मैदान मारून थेट दिल्ली गाठली. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. “आयात’ पालकत्त्व लादण्याचा विचार बाजुला झाल्यास गेली 25 वर्षे कमळ फुलविणाऱ्या मावळला पालकमंत्रिपद मिळण्याची शक्‍यता अधिक गडद आहे. त्यातही विशेषत: गिरीश बापट यांच्यानंतर जिल्ह्यात निष्ठावंत म्हणून आमदार बाळा भेगडे यांना पहिली पसंती मिळू शकते.

जून महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये आमदार जगताप किंवा भेगडे या दोघांपैकी एकाची कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाकडे पालकमंत्रीपद येऊ शकते. ऐनवेळी दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांना देखील पालकमंत्रिपद दिले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण, कुल यांच्या पत्नी कांचन यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे “धनुष्य’ पेलले आणि त्यांना कडवे आव्हान दिले होते.

पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट पुणे मतदारसंघाचे खासदार झाल्याने रिक्‍त झालेले पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता लागली आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यामध्ये पालकमंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

अवघ्या चार महिन्यांवर राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे किंवा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे देखील पालकमंत्रिपद दिले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या कांबळे परभणीचे, तर शिवतारे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे दोघांचा विचार होईल, ही शक्‍यता कमी आहे.

…म्हणून लक्ष्मण जगताप शर्यतीत

पालकमंत्रिपदासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप दावेदार मानले जातात. कारण, जगताप यांनी अजित पवार यांचा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती “कमळ’ फुलविले. महापालिकेत सत्ता आल्यास ‘लाल’ दिवा देण्याचे आश्‍वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून जगताप यांनी तब्बल 96 हजार 758 हजाराचे मताधिक्‍य दिले. त्यामुळे बारणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या कामगिरीमुळे पालकमंत्रिपदासाठी जगताप यांचे पारडे जड मानले जात आहे. तसेच आमदारकीची त्यांची तिसरी टर्म आहे. एकवेळेस विधानपरिषदेचे देखील जगताप आमदार होते. त्यांचा अनुभव दांडगा आहे. दरम्यान, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या एकाही आमदाराला मंत्रिपद दिले नाही; पण आता अन्य पक्षातून आलेले आमदार नाराज होऊ नयेत यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिपद दिले जाते का? याकडे पिंपरी-चिंचवडसह राज्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्ष राहिलेले बाळाभाऊंचे पारडे जड

पालकमंत्रिपदासाठी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे हे देखील प्रबळ दावेदार आहेत. सलग दोनवेळा ते मावळमधून निवडून आले आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी नगरपरिषदेत भाजपची सत्ता आणली. तसेच लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना मावळमधून 21 हजार 827 मतांची आघाडी दिली. भेगडे भाजपचे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी भेगडे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.