मुलतान – पाकिस्तानमध्ये बहुतेक सर्व विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’च्या उद्या मुलतानमध्ये होणाऱ्या भव्य रॅलीच्या पार्श्वभुमीवर विरोधी नेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे.
त्यामध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीचे वरिष्ठ नेते अली कासिम गिलानी यांच्यास अन्य काही पक्षांच्या 30 नेत्यांचाही समावेश आहे. उद्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभे केले आहेत.
सभेच्या ठिकाणी जाणाऱ्या विरोधकांनी हे अडथळे हटवले आणि सरकार विरोधी घोषणाबाजी करून मुलतानमधील किला कासिम बाग येथे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी “पीपीपी’च्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले. “पीपीपी’च्या कार्यकर्त्यांनी किला कासिम बाग स्टेडियमचा ताबा घेतला असून स्टेडियमबाहेर स्वागत कक्षदेखील उभा केला आहे, असे “पीपीपी’च्या प्रसार माध्यम कक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे कार्यकर्तेही मुलतानला पोहोचले असून त्यांनी कासिम बाग स्टेडियमचे प्रवेशद्वार तोडून स्टेडियममध्ये प्रवेश केला आहे, असेही “पीडीएम’चे नेते मुसा गिलानी यांनी म्हटले आहे.
पोलिसांनी आतापर्यंत 70 नेते आणि 300 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्याविरोधात प्रवेशद्वाराची मोडतोड केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. उद्या होणाऱ्या सभेसाठी खाद्यपदार्थांची सेवा पुरवण्याचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्य सरकारने अशाप्रकारे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या कानाकोपऱ्यात आंदोलन भडकेल. त्यामुळे विरोधकांच्या सभेला अडथळा आणू नये, असे आवाहन “पीपीपी’चे नेते बिलावल भुट्टो यांनी मुलतान प्रांताच्या सरकारला केले आहे.