नागरिकांशी थेट संवाद इम्रान खान यांना पडला महागात

सरकारचे वाभाडे काढणारा व्हिडीओ झाला व्हायरल

इस्लामाबाद – पाकिस्तानात महागाईने परिसीमा गाठली आहे. रोजच्या खाण्यापिण्याची सामान खरेदी करणेही पाकिस्तानी लोकांना कठीण झाले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान हल्ली टीव्हीवरून पाकिस्तानी जनतेशी संवाद साधत आहेत. अशाच एका संवादात एका सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकाने पंतप्रधान इम्रान खान यांचाच थेट अपमान करत त्यांना निरूत्तर केले. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

मुळचा पाकिस्तानी पण सध्या विदेशात राहात असलेल्या या नागरिकाला इम्रान खान यांच्या पक्षाकडून मोठी अपेक्षा होती. पण त्याची एकही अपेक्षा पूर्ण झाली नाही. या व्यक्तीने पंतप्रधान इम्रान खान यांना खास पद्धतीने देशातील नागरिकांच्या अवस्थेची माहिती दिली आणि इम्रान खान ऐकण्यापलीकडे काहीच बोलू शकले नाहीत.

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला टीव्ही अँकर संबंधित व्यक्तीला सांगतो की, तुम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोलत आहात. त्यानंतर तो व्यक्ती इम्रान खान यांना नमस्कार करतो आणि बोलायला सुरुवात करतो. मी तुमच्या पक्षाला मतदान केलं होतं. पक्षाला देणगीही दिली होती. मी तुमच्या पक्षाला मत देण्यासाठी सौदी अरबमधून आलो होतो. आता सर्वकाही खूप चांगल्याप्रकारे सुरू आहे. मी तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी फोन केला आहे.

तो व्यक्ती पुढे म्हणतो की, तुम्ही जनतेला आश्वासन दिलं होतं की, एक कोटी नोकऱ्या उपलब्ध करेन, आता पाकिस्तानमध्ये कुणीही बेरोजगार नाही. सर्वजण खूश आहेत. चीन, कोरिया आणि अमेरिकेतून लोक येत आहेत. विमानतळावर सौदी विमानतळावरून कामगार येत आहेत. त्यांच्या विमानानेही लॅंड केलं आहे. तुम्ही 50 लाख घरांचं आश्वासन दिलं होतं, ते ही तुम्ही पूर्ण केलं. आता आपल्या पाकिस्तानात जी जुनी घरं आहेत ती रिकामी पडून आहेत. ते आता आम्ही कुणाला तरी भाड्याने देऊ आणि नव्या घरात राहायला जाऊ.

तो व्यक्ती पुढे बोलतो की, परदेशात राहात असलेले सर्व पाकिस्तानी खूप ुश आहेत. तिकीटही स्वस्त झाले आहे. वीज फुकट मिळत आहे. पेट्रोलचे भाव रोज कमी होत आहेत. पाकिस्तानचा विकास जोरात सुरू आहे. परदेशात पाकिस्तानची प्रतिष्ठा वाढत आहे. आपल्या प्रयत्नांमुळे पाकिस्तान आता स्वित्झर्लंडपेक्षाही पुढे जात आहे.

इम्रान खान यांचा अपमान इथेच थांबला नाही. त्या व्यक्तीने पुढे बोलताना म्हटलं की, 350 धरणं बनली, शेतीचा विकास होत आहे. लोक खूपच खूश आहेत. सर्वजण तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. आम्हाला माहिती मिळाली आहे की तुम्ही चांद्रमोहीमेची तयारी करत आहात. तिथे पाकिस्तानी नागरिकांसाठी एक कॉलनी निर्माण करणार आहात.

आपल्या योजनांमुळे महागाई पूर्णपणे संपली आहे. अशा शब्दांत या व्हायरल व्हिडीओमध्ये इम्रान खान यांचा अपमान सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे विरोधकांच्या आंदोलनांमुळे बेजार झालेल्या इम्रान यांची आता जनतेच्या नाराजीमुळेही मोठी कोंडी होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.