इस्लामाबाद – बलुचिस्तान या पाकिस्तानातील अशांत प्रांतातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पाकिस्तान सरकारने एक अजब फतवा जारी केला असल्याचे वृत्त झळकले आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाकिस्तान झिंदाबाद अशी कॉलरट्युन मोबाइलमध्ये सेट करावी असा आदेश त्यांना देण्यात आला असल्याचे संबंधित बातमीत म्हटले आहे.
गेल्या काही काळापासून किंबहुना पाकिस्तानच्या निर्िर्मतीपासूनच बलुचिस्तानात अशांतता आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती सरकारच्या विरोधात येथे प्रचंड नाराजी असून त्यांचा रोष नेहमीच त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच पाकिस्तानात आता त्यांची कोंडी करण्याच्या दृष्टीने असा आदेश काढला गेला असल्याच्या अँगलने या घटनेकडे पाहिले जाते आहे.
कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून सेवा घेत असाल तरी मोबाइलमध्ये पाकिस्तान झिंदाबाद अशी कॉलरट्युन सेट करा असा आदेश पाकिस्तान सरकारने बलुचिस्तान प्रांताच्या संपूर्ण प्रशासनाला दिला आहे. यासाठीची प्रक्रिया सरकारी आदेशाच्या माध्यमातून बलुचिस्तान प्रांताच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगण्यात आली आहे.
बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानविरोधी निदर्शने कायमच सुरू असतात. तेथे ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत आहेत. पाकिस्तानच्या पोलिसांना आणि जवानांना लक्ष्य करून हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले करणे तसेच पाकिस्तानच्या सुरक्षा पथकांवर हल्ले करणे या दोन पद्धतीने त्यांचा संघर्ष सुरू आहे. गेल्याच आठवड्यात मोहम्मद अली जीना यांचा पुतळाही बॉम्बस्फोट करून नष्ट करण्याचा प्रकार पाकिस्तानात घडला आहे. त्यामागेही बलुचींचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पाक सरकारने हे पाउल उचलले असल्याचे मानले जाते आहे.