परतीच्या पावसामुळे कांदा महागला

पुणे – अतिवृष्टीमुळे राज्यातील नवीन कांदा पिकाचे झालेले नुकसान…तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांदा…परराज्यातून असलेल्या मागणीमुळे कांद्याचे भाव कडाडले आहेत.

परिस्थिती पाहता डिसेंबरपर्यंत कांदा तेजीत राहणार असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील व्यापारी रितेश पोमण यांनी वर्तविला आहे. सध्या घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये, तर, जुन्या कांद्यास 50 ते 63 रुपये भाव मिळत आहे. दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो भावाने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री होत होती. मात्र, जास्त प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसल्याचे सांगत रितेश पोमण म्हणाले, नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे 50 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. रविवारी केवळ 300 पोती नवीन कांद्याची आवक झाली.

डिसेंबर महिन्यात चांगल्या नवीन कांद्याचे पिक बाजारात येईल. तोपर्यंत भाव चढेच राहणार आहेत. जुना कांदा तुलनेने कमी उपलब्ध आहे. असलेल्या मालापैकी 60 ते 70 माला नित्कृष्ट दर्जाचा आहे. बाजारात चांगल्या मालाला मागणी आहे. त्यातच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यातील कांद्याचे पिक येत असते. मात्र, पावसमुळे तेथील कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

राज्यातील सुकलेल्या आणि वाळलेल्या कांद्याला त्या राज्यातून मागणी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव तेजीत आहेत. रविवारी येथील बाजरात सुमारे 60 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.