पाटणा – बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपने शब्द पाळत नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली खरी, मात्र अरुणाचल प्रदेशात आमदार फोडून भाजपने जेडीयूला धक्काच दिला आहे.
एनडीएमध्ये खेचाखेची सुरु होताच विरोधकांच्या गोटातही चुळबूळ सुरु झाली. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमारांनी खुली ऑफरच दिली आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची द्या, आम्ही तुम्हाला पंतप्रधानपदाचे उमेदवार करतो, असा प्रस्ताव राजदने ठेवल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ही ऑफर दिली. जर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री केलं, तर 2024 मधील पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठी विरोधी पक्ष त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतील असा प्रस्ताव चौधरींनी दिल्याचं वृत्त एका हिंदी वाहिनीने दिले आहे.
राजदने सत्तेत येण्याची आशा अजूनही सोडलेली दिसत नाही. पुन्हा एकदा नितीश कुमार यांची साथ देण्याची त्यांची तयारी आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये अरुणाचल प्रदेशात गेलेला तडा निमित्त ठरला आणि नितीश कुमारांना दिल्लीला पाठवण्याचा प्रस्ताव राजदने ठेवला आहे.
बिहारमध्ये भाजपचा वरचष्मा
243 जागा असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या वाट्याला 125 जागा आल्या. यापैकी भाजपने 74 जागा जिंकल्या, तर जेडीयूला केवळ 43 जागांवर समाधान मानावे लागले.
भाजपला जेडीयूपेक्षा खूप जास्त जागा मिळूनही भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं. नितीश कुमारांच्या कॅबिनेटमध्ये भाजपने महत्वाची खाती आणि दोन उपमुख्यमंत्रिपदं राखत वरचष्मा राखण्याचा प्रयत्न केला आहे.