ऑकलंड – करोनाचा धोका पूर्णपणे कधी संपणार हे कोणीच सध्या सांगू शकत नाही, मग टी-20 विश्वकरंडक स्पर्धादेखील ऑलिम्पिकप्रमाणे पुढील वर्षी घेतली तर काय हरकत आहे, अशा शब्दात न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रॅंडन मॅकलम याने आयसीसी व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर टीका केली आहे.
सध्या जगभरात करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेला अद्याप सहा महिने असले तरीही करोनाचा धोका कायम राहील असे चित्र सध्या दिसत आहे. मग स्पर्धा महत्त्वाची का लोकांचा जीव महत्त्वाचा हे आता तरी लक्षात घेतले पाहिजे. केवळ आर्थिक फायदा डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा त्यातील धोका लक्षात घेतला पाहिजे, असे मत मॅकलमने व्यक्त केले आहे.करोनाच्या धोक्यामुळे जपानमध्ये होणारी सर्वात मानाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी घेण्याचा निर्णय झाला. तसेच आयपीएल स्पर्धासुद्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली गेली आहे. जर प्रत्येक देश आपल्या लोकांच्या जीवाची काळजी घेत आहे. अशा स्थितीत विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्याचा अट्टहास का केला जात आहे, अशी विचारणाही मॅकलमने केली आहे.
बीसीसीआयला केवळ आयपीएल नव्हे तर आगामी काळातील काही स्पर्धादेखील स्थगित कराव्या लागणार आहेत. करोनावर नियंत्रण मिळाले तरीही पुढील 2 ते 3 महिने कोणत्याही स्पर्धा घेता येतील असे मला वाटत नाही. संपूर्ण स्पर्धा रद्द करा असे मला सांगायचे नाही पण निदान पुढील वर्षापर्यंत स्पर्धा पुढे ढकलली गेली तर खेळाडू, कर्मचारी तसेच प्रेक्षक सुरक्षीत राहतील आणि सध्या तेच जास्त महत्त्वाचे आहे, असेही मॅकलमने स्पष्ट केले आहे.
आयपीएल स्पर्धा कधी आयोजित केली जाईल याबाबत सध्यातरी काही सांगता येणार नाही. मात्र, जर विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली गेली आणि त्यावेळी करोनाचा धोका व त्याबाबतची परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला गेला पाहिजे. मात्र, विश्वकरंडक स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होत असली तरी ती पुढे ढकलून त्याच काळात आयपीएल खेळविली गेली तर आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठीही सकारात्मक वातावरण तयार होईल. विश्वकरंडकापूर्वी काही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. आशिया चषक टी-20 स्पर्धा होणार आहे. जर ही स्पर्धा यशस्वीरीत्या झाली तर विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्यात काहीच अडचण येणार नाही, असेही त्याने सांगितले.