नव्या मोटर वाहन कायद्यामुळे शिस्त येणार?

File pic

बेशिस्त लोकांकडून मोठ्या रकमेचा दंड वसूल होणार

नवी दिल्ली -रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात मोटार वाहन दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले आहे. यात रस्त्यावरील विविध गुन्ह्यांना पूर्वीपेक्षा कडक शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली असल्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात शिस्त निर्माण होण्यास मदत होणार आहे.

या विधेयकानुसार आता रस्त्यावर बेफाम वाहन चालविल्यानंतर 5 हजार रुपयांचा दंड होणार आहे. पूर्वी केवळ 1 हजार रुपये एवढा दंड होता. त्यामुळे बेफामपणे वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या पूर्वी 2 हजार रुपयांचा दंड होता तो वाढवून आता 10 हजार रुपये करण्यात आला आहे.
त्याचबरोबर वाहनचालकाची ओळख लवकर पटावी याकरीता वाहनाची नोंदणी करताना आणि वाहन चालविण्याचा परवाना घेताना आधारकार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे गुन्हा करणाऱ्याची ओळख पटण्यास मदत होईल.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्‍तीला मदत करणाऱ्यांनाही या अगोदर काही खटल्यांना सामोरे जावे लागत असे. त्यामुळे नागरिक मदत करण्यासाठी टाळाटाळ करीत होते.

मात्र आता नव्या कायद्यानुसार मदत करणाऱ्या नागरिकांना कसल्याही नागरी किंवा फौजदारी खटल्याला सामोरे जावे लागणार नाही. वाहन चालविताना सीट बेल्ट न लावणे किंवा हेल्मेट न घालणे या प्रकारासाठी केवळ 100 रुपयाचा दंड द्यावा लागत होता. आता यासाठी 1 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्समधील नुकसानभरपाईची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

ओला, उबेर सारख्या कंपन्यांना चालक आणि ग्राहकांमधील मध्यस्थ समजण्यात येणार आहे. त्यामुळे या कंपन्यांना राज्य सरकारकडे नोंदणी करावी लागणार आहे. हिट अँड रनमध्ये जखमीसाठी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. तर मृत्यूसाठी दोन लाख नुकसानभरपाई द्यावी लागेल. चालू अधिवेशनातच हे विधेयक मंजूर होण्याची शक्‍यता आहे. भारतातील अपघाताचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी रस्त्यावर लाखो लोक मृत्युमुखी पडतात तर तेवढेच जखमी होतात. मरणाऱ्यात तरुणांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)