नवी दिल्ली – ब्रिटन आणि द. आफ्रिकेत करोनाचा नवा विषाणू आढळल्यामुळे घबराट आहे. या विषाणूचा प्रसाराचा वेग जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जगभरातील काही प्रमुख कंपन्यांनी अगोदरच करोनावर जी लस तयार केली आहे, ती आता उपयुक्त ठरणार का अशी शंका निर्माण झाली आहे. त्यावर तज्ञांकडून दिलासादायक आणि अत्यंत सकारात्मक बातमी आहे.
करोनाची लस या नव्या विषाणूवरही उपयुक्त ठरणार आहे. ती उपयुक्त ठरत नाही असे कोणतेही तथ्य अद्याप समोर आले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मंगळवारी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्य वैज्ञानिकल सल्लागार विजय राघवन म्हणाले की, ब्रिटन आणि आफ्रिकेत विषाणूचे जे नवे स्वरूप समोर आले आहे, त्यात करोनावरची लस अपयशी ठरली असल्याचे कोणतेही पुरावे भारतात अथवा जगात अद्याप तरी समोर आलेले नाहीत. बहुतांश लसी स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतात व त्यात बदल होत असतो. मात्र लस आपल्या शरीराची एकूणच प्रतिकारक शक्ती सक्षम करण्यास मदत करत असते व त्यामुळे अँटीबॉडी विकसित होत असतात.
दरम्यान, करोनाचे नवे रूग्ण आढळण्याचे आणि त्यामुळे मृत्यू होण्याचे जगभरातील प्रमाण एकदम खाली आले असल्याचे व ही अत्यंत आश्वस्त करणारी बाब असल्याचे नीती आयोगाचे आरोग्य विभागाचे सदस्य व्हि के पॉल यांनी म्हटले आहे. करोनाचे नवे रूग्ण सापडण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असून मृत्यूदरही घसरत चालला आहे. या दोन्ही समाधानकारक गोष्टी असल्याचे ते म्हणाले.
जगातल्या काही देशांत करोनाने पुन्हा भयावह स्थिती निर्माण केली असताना या बाबी दिलासा देणाऱ्या आहे. हिवाळ्याच्या काळात अधिकतर लोकसंख्येला आरोग्य विषयक काही समस्या भेडसावत असतातच. त्या दृष्टीने अद्याप धोका टळलेला नाही. विषाणूचे ब्रिटीश स्वरूप भारतासह अन्य देशांतही पोहाचले आहे. त्याचा एक कालावधी असणार आहे. त्यामुळे सावध राहावे लागेल.