पुणे : “राष्ट्रवादी”चे थोरल्या पवारांना “साकडे”

पुणे – राज्यातील अगामी महापालिका निवडणुकांसाठी शासनाने तीनचा प्रभाग निश्‍चित केला आहे. याचा जोरदार धक्का राष्ट्रवादीसह, कॉंग्रेस आणि शहर शिवसेनेलाही बसला आहे.

त्यामुळे शहरातील पदाधिकाऱ्यांकडून तातडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवित, चारच्या प्रभागात भाजपला शहरात चांगले यश मिळाले होते. त्यामुळे महापालिकेत भाजपला पराभूत करायचे असल्यास दोनचा प्रभाग करावा अथवा ते शक्‍य नसल्यास पुण्यातही एकचा प्रभाग असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तर शहर कॉंग्रेसच्या आग्रही मागणीमुळे कॉंग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत या निवडणुकांसाठी दोनचा प्रभाग असावा, असाच ठराव करण्यात आला आहे. मात्र, त्याच वेळी शहर शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली असून पक्षाकडून वरिष्ठांकडे प्रत्येक बैठकीत दोनचा प्रभाग असावा, अशी मागणी केलेली असतानाही तीनच्या प्रभागाचा निर्णय झाल्याने “आपलेच दात आणि आपलेच ओठ’ बोलायचे कोणाला अशी भूमिका घेण्यात आली आहे.

पुढील वर्षी मार्च 2022 अखेर पुणे महापालिकेची मुदत संपत आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुका मोदी लाट असल्याने राज्यातील सत्ताधारी भाजपने चारचा प्रभाग करून लढविल्या. त्यात, भाजपला शहरात महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी बहुमत मिळाले.

त्यापूर्वी 2002, 2007 तसेच 2012 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 40च्या पुढचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे 2022 मध्ये भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील या तीनही पक्षांकडून आघाडीबाबत एकवाक्‍यता नसली तरी या निवडणूका दोनच्या प्रभागातच व्हाव्यात, अशी भूमिका पक्षाच्या राज्यातील नेत्यांकडे वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय होईल, अशी अपेक्षा या तीनही पक्षांना होती.

मात्र, बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चारचा प्रभाग असावा असा प्रस्ताव आला. त्यानंतर त्यावर चर्चा होऊन तीनचा प्रभाग करण्याचे निश्‍चित झाले. परिणामी, या निर्णयाने या तीनही पक्षांच्या शहर पदाधिकारी तसेच विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनाही धक्का बसला आहे.

हा निर्णय झाला त्यावेळी महापालिकेची मुख्य सभा सुरू होती. यावेळी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तातडीने पक्षाध्यक्ष पवार यांना फॅक्‍सद्वारे पत्र पाठविले. त्यात, चारचा प्रभाग भाजपला अनुकूल असून या निर्णयाने महाविकास आघाडीलाच फटका बसणार आहे. तसेच महिला आरक्षण तसेच इतर आरक्षणेही अडचीणीची होणार आहेत. त्यामुळे, शक्‍य तो दोनचा प्रभाग करावा तसेच शक्‍य नसल्यास एकचा प्रभाग करावा, अशी मागणी करण्यात आली. त्याच वेळी, कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांकडूनही तातडीने पक्ष प्रमुखांना याबाबत पत्र पाठवित या निवडणुकांसाठी दोनचा प्रभाग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेला तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार!
या निर्णयाने शहर शिवसेनेचीही कोंडी झाली आहे. शिवसेनेला शहरात आतापर्यंत दोनचा प्रभाग असतानाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, तर चारच्या प्रभागात 2017 मध्ये शिवसेनेची शहरात वाताहत झाली असून केवळ 9 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला महापालिकेत सत्तेत बसण्याची संधी आली असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून तीनच्या प्रभागाचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे आता सरळ सरळ पक्षाचे नुकसान होत असल्याचे दिसतानाही शहर शिवसेनेला याबाबत काहीच हालचाल करता येणार नसल्याचे पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय शिवसेनेसाठी तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार ठरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.