मुंबई – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. धनंजय मुंडे मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून परळीकडे परतत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.
मुंडे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने काही दिवस मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार असून या काळात आपल्याला भेटता येणार नाही, मात्र लवकरच आपल्या सर्वांना भेटायला व पुन्हा जनसेवेत रुजू व्हायला परळीला येईन. मी रुग्णालयात असताना राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, पत्रकारिता आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी काळजी व्यक्त करत विचारपूस केली, त्या सर्वांचे तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार!