पुणे-महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी ही निवडणूक स्बवळावर लढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहेत. तर कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले हेदेखील पुणे दौऱ्यावर येत असून कॉंग्रेसने “परिवर्तन रॅली’ आयोजित केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुका कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढणार असल्याचे तीनही पक्षाचे नेते सांगत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्बवळावर लढण्याचा नारा दिला होता. त्यानंतर आघाडी होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यात आता प्रारूप प्रभाग रचना सादर होताच “राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही ही प्रभाग रचना पक्षाला अनुकूल असून, पक्षाचे 122 नगरसेवक निवडून येतील,’ असा दावा करत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यावरून कॉंग्रेस आणि शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, आता शनिवारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात येत असून कॉंग्रेसकडून कॉंग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे पटोले राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत काय बोलणार याबाबत उत्सूकता आहे.