बारामती – ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या जलतरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगाच्या कार्यक्रमातील मंचावर पवार कुटुंबियांनी त्यांच्या बालपणातील पोहण्याची किस्से सांगितले. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र त्यांच्या पोहण्याचा किस्सा सांगताना जोरदार बॅटिंग केली कोपरखळ्या ही मारल्या.
शारदानगर येथील जलतरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात आम्ही काटेवाडीला सुट्टीला आल्यानंतर तात्यासाहेब काका (स्व. अनंतराव पवार) हे आम्हा भावंडांना पोहायला शिकवायचे. त्यावेळी डब्बा बांधून आम्ही पोहायचो, त्यांच्यामुळेच आम्ही सर्व भावंडे पोहायला शिकलो. कधी विहिरीमध्ये तर कधी ओढ्यात आम्ही पोहायचो, या आठवणी खासदार सुळे यांनी सांगितल्या.
यावेळी खा. सुळे म्हणाल्या, सर्वांना पोहता येतं ही पवार कुटुंबीयांची खासियत आहे. ज्यांना पोहता येत नव्हतं, त्यांना तात्यासाहेब काका डब्बा बांधून विहिरीत ढकलून द्यायचे, ज्यांना बरं पोहता येतं, त्यांना विहिरीत ढकलल जायचं. त्यामुळे आमच्यापुढे पोहण्याशिवाय पर्याय नव्हता. पाण्यात पडलं की पोहायला येतं, ही म्हण पवार कुटुंबातील लहान मुलांना लागू पडते. लहानपणी आई मला मुंबईतील जलतरण तलावामध्ये पोहायला घेऊन जायची, त्यामुळे याचे क्रेडिट आईला आहे, वडिलांना नाही, कारण त्यांना कामाच्या व्यापामुळे आम्हाला घेऊन जाण्यासाठी वेळ नव्हताच.
यांनतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी सांगितलेल्या आठवणींचा धागा पकडत ते म्हणाले, बोलण्याच्या ओघात सुप्रिया फाटा ऐवजी ओढा असे म्हटली, तो ओढा नव्हता तर तो 33 फाटा होता. आम्ही सर्वजण त्या फाट्यामध्ये अथवा विहिरीमध्ये कमरेला डब्बा बांधून पोहायचो. मला पाण्याची फार भीती वाटायची, डब्याला बांधलेला दोर तुटला तर आपलं काय होईल ही भीती मला खूप वाटायची.. पण आमच्या वरिष्ठांना त्याचं काही वाटत नव्हतं.. ते वरून खाली फेकून द्यायचे.. तेव्हापासून वरिष्ठ असेच वागतात… त्यामुळे माझा लहान भाऊ श्रीनिवास हा माझ्या अगोदर पोहायला शिकला. तो कौतुकाने मला ‘दादा मी पोहायला शिकलो’, असे म्हणाला.
माझ्या अगोदर माझा धाकटा भाऊ पोहायला शिकला, या गोष्टीमुळे मी अस्वस्थ झालो, त्या रात्री मला झोप देखील आली नाही, या जिद्दीने मी दुसऱ्याच दिवशी पोहायला शिकलो, अशी मुश्किल कबुली अजित पवार यांनी यावेळी दिली. पवार यांच्या या आठवणीने संपूर्ण सभागृह हास्याच्या लकेरीत डुबले. यानंतरही अजित पवार यांनी चुलत मोठे बंधू व ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केलेल्या पेहरावाबद्दल बोलताना, आज राजेंद्रदादाने जिन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूज घातला आहे, त्यामुळे तो रोहितचा भाऊ वाटतोय.
मी मोठा वाटतोय आणि तू (राजेंद्र पवार) छोटा दिसतोय, या फिटनेसचे रहस्य विचारले तर तो सांगत नाही, अशी मिश्किली त्यांनी केली. शरद पवार यांनी देखील आपल्या भाषणात आम्ही लहान असताना पोहोण्यासाठी आजच्यासारखी सुविधा नव्हती, बारामती शहरातील निरा डावा कालवा हे आमचे पोहोण्याचे एकमेव ठिकाण होते, ही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.